हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई
By नरेश रहिले | Published: April 9, 2024 05:39 PM2024-04-09T17:39:48+5:302024-04-09T17:41:27+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर 'ऑपरेशन नार्कोस'.
नरेश रहिले, गोंदिया: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतून अवैध अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखण्यासाठी विशेष देखरेखीत ऑपरेशन ‘नार्कोस’ राबविण्यात येत आहे. ८ एप्रिल रोजी निवडणुकीच्या स्पेशल ड्राईव्ह चालवून 'ऑपरेशन नार्कोस' अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल गोंदिया आणि टास्क चमूने गाडी क्रमांक १२८३४ च्या जनरल कोचमधून १४ किलो ५३४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २ लाख ९० हजार ६८० रूपये आहे.गोंदिया रेल्वे सुरक्षा बलाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतून होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन नार्कोस' मोहीम राबविली. ८ एप्रिल २०२४ विभागीय सुरक्षा आयुक्त आरपीएफ दीपचंद्र आर्य यांच्या निर्देशानुसार आणि आरपीएफ पोलीस निरीक्षक व्ही.के.तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफ जवानांनी विशेष कार्य पथक तयार केले. या पथकाने आमगाव-गोंदिया दरम्यान रेल्वे गाडी क्रमांक १२८३४ हावडा-अहमदाबाद सायंकाळी ६:५१ वाजता फलाट क्रमांक ३ वर येताच या एक्स्प्रेसच्या इंजिनपासून तिसरा जनरल कोच क्र. एसआर १५६४२३/सी ची तपासणी केल्यावर एका सीटच्या खाली ३ पिशव्या सापडल्या.
डब्यात बसलेल्या प्रवाशांकडून या बॅगबाबत विचारणा केली असता एकाही प्रवाशाने बॅगच्या मालकाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पथकाने बॅग उघडली असता तपकिरी रंगाच्या टेपने गुंडाळलेली गांजाची ७ पाकिटे आढळून आली. या पथकाच्या सदस्यांनी फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी करताना बॅग काढून घेतली. गोंदियाचे अतिरिक्त तहसीलदार विकास सोनवणे यांच्या समोर कारवाई करण्यात आली. सर्व पाकिटांमधून नमुने काढून उर्वरित बंडल सील करण्यात आले. नियमांचे पालन करून पुढील कारवाईसाठी कागदपत्रांसह पिशव्या व बंडल जीआरपी गोंदिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. गोंदिया रेल्वे पोलिसांनी मादक पदार्थ विरोधी अधिनियमाचे कलम ८ (सी), २० (ब)(आयआय)(बी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.