जिल्ह्यात दररोज कोरोनाच्या सुमारे तीन हजार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:27 AM2021-03-15T04:27:09+5:302021-03-15T04:27:09+5:30
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. यात काही जिल्ह्यांतील स्थिती आता आवाक्याबाहेर जात असल्याचे बघून तेथे लॉकडाऊनची ...
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. यात काही जिल्ह्यांतील स्थिती आता आवाक्याबाहेर जात असल्याचे बघून तेथे लॉकडाऊनची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर निर्माण झालेली स्थिती टाळता यावी म्हणून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त संशयितांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने आता जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्यांवर भर दिला जात आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोना पुन्हा पाय पसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. यामुळे जास्तीत जास्त बाधित व त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या करून वेळीच कोरोना उद्रेकाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातच मागील काही दिवसांतील आकडेवारी बघता जिल्ह्यात दररोज सुमारे तीन हजार चाचण्या केल्या जात असल्याचे दिसत आहे. यात चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढत असून, एकंदर जास्तीत जास्त बाधितांना शोधण्यात यश येत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
--------------------
रविवारच्या आकडेवारीनुसार १२०८ वेटिंग
रविवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १२०८ चाचण्यांचा अहवाल प्रलंबित होता. म्हणजेच जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण यावरून दिसून येते. जिल्ह्यात शनिवारी ५४४ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची नोंद असताना रविवारी ४१ बाधितांची भर पडली होती. आता रविवारी १२०८ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित असताना सोमवारी किती बाधितांची भर पडणार हे सांगणे कठीणच आहे. मात्र, जास्तीत जास्त चाचण्या करून वेळीच रुग्णांना गाठण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे.
----------------------------
आता मास्क व गर्दी टाळणे हेच उपाय
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही जिल्ह्यातील चित्र बघता आताही नागरिकांत गांभीर्य आले नसल्याचे दिसते. मास्क न वापरता फिरणे व शारीरिक अंतराचे पालन करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. हाच प्रकार धोकादायक असून, यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. मात्र, कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्क व गर्दी टाळणे हेच उपाय गरजेचे आहेत.