अनुपस्थितीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:28 AM2021-04-13T04:28:01+5:302021-04-13T04:28:01+5:30

अर्जुनी-मोरगाव : मृत कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र, अख्ख्या नगरपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तब्बल ३ तास ...

Absence delays funeral of corona | अनुपस्थितीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विलंब

अनुपस्थितीमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारास विलंब

Next

अर्जुनी-मोरगाव : मृत कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र, अख्ख्या नगरपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तब्बल ३ तास घरात मृतदेह ठेवावा लागला. अखेर त्या बाधित मृतदेहाची रात्री १२ वाजल्यानंतर विल्हेवाट लावावी लागली. हा संतापजनक प्रकार येथील सिग्नलटोली येथे रविवारी (दि. ११) रात्री घडला. शासन कोरोनाप्रती कितीही अलर्ट असले तरी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कशी हेळसांड होते याचा उत्तम नमुना बघावयास मिळाला. या प्रकारामुळे नगरपंचायतप्रती मात्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिग्नलटोली येथील इसम (५६) हे गुरुवारी (दि. ८) बाधित आढळून आले होते. त्यावेळी कोविड केअर सेंटरची व्यवस्था नसल्याने गृह विलगीकरणात होते. त्यांना आधीच उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ते शेळ्या चारण्यासाठी गेले होते. रात्री ७ वाजता श्वसनाचा त्रास होऊ लागला. आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, रात्री ८.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. नोडल अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांनी महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला कळविले. तातडीने तहसीलदार विनोद मेश्राम यांनी मृताच्या घरी भेट दिली. मात्र, नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी कुणीही पोहोचले नाही. यात तब्बल ३ तास लोटले. अखेर रात्री ११.३० वाजता नगरपंचायतचे कर्मचारी मृताच्या घरी ट्रॅक्टर घेऊन दाखल झाले. रात्री १२ वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विलंब होत असल्याने काही काळ शेजाऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. तहसीलदार, नोडल अधिकारी, पोलीस कर्मचारी, तलाठी, आरोग्य कर्मचारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. आरोग्य विभागाने सोमवारी एक पथक पाठवून परिसरात चाचण्या केल्या.

-------------------

मी रजेवर ----- मुख्याधिकारी

कोरोनाबाधित मृताची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन २ दिवसांच्या रजेवर गेले होते. २ दिवसांची रजा असल्याने प्रभार दिला नाही. मृताविषयी मला रात्री १०:३० वाजता कळले. मला कळले तेव्हा मी अर्जुनीला येण्यासाठी प्रवासात होते. रात्री उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांकडून भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात विलंब झाला, अशी माहिती मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांनी दिली.

Web Title: Absence delays funeral of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.