गाडीत टीटीईला गैरहजर राहणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:08+5:302021-07-14T04:34:08+5:30
गोंदिया : रेल्वे गाडीत टीटीई नसल्याने प्रवाशांना सुविधा मिळण्यास अडचण होवून मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशाने यासंदर्भात ...
गोंदिया : रेल्वे गाडीत टीटीई नसल्याने प्रवाशांना सुविधा मिळण्यास अडचण होवून मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशाने यासंदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार केली. यावर ग्राहक मंचाने रेल्वे विभागाला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे रेल्वे गाडीत टीटीई नसण्याची बाब चांगलीच महागात पडली.
प्राप्त माहितीनुसार गोंदिया येथील रहिवासी सुधीर राठोड व त्यांची पत्नी मीनाक्षी राठोड हे ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पुणेहून आझाद हिंद एक्सप्रेसने स्लीपर डब्ब्यातून प्रवास करीत होते. मात्र या डब्यात प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना शौचालयापर्यंत जातांना प्रचंड अडचण होत होती. याची तक्रार करण्यासाठी प्रवाशांनी टीटीईचा शोध घेतला मात्र या कोचमध्ये एकही टीटीई उपलब्ध नव्हता. त्यामुळे राठोड यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. गाडी गोंदिया स्थानकावर पोहचल्यानंतर राठोड यांनी याची रेल्वेच्या तक्रार निवारण विभागाकडे लेखी तक्रार नोंदविली. मात्र यानंतरही योग्य कार्यवाही न झाल्याने त्यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत पुणे, भुसावळ, नागपूर येथील रेल्वेच्या विभागाकडून टीटीई अनुउपस्थित असल्याबाबतची माहिती मागविली. तेव्हा त्यांना पुणे ते नागपूर दरम्यान स्लीपर कोचमध्ये एकही टीटीई कर्तव्यावर नसल्याची माहिती मिळाली. रेल्वे विभागाच्या नियमानुसार तीन स्लीपर कोचनंतर एक टीटीई असणे आवश्यक आहे. मात्र आझाद हिंद एक्सप्रेसला ११ कोच असून सुध्दा टीटीई कार्यरत नव्हते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे राठोड यांनी रेल्वे बोर्डाकडे तक्रार केली. तसेच याप्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली. ग्राहक मंचाने तक्रारीच्या अनुषंगाने सर्व गोष्टींची पडताळणी करुन कोचमध्ये टीटीई नसल्याची बाब नियमबाह्य असल्याचे सांगत रेल्वे विभागाला ३० हजार रुपयांचा दंड ठोठवला. तब्बल चार वर्षानंतर यावर २६ जून २०२१ रोजी ग्राहक मंचाने सुनावणी करीत हे आदेश दिले.
.............
दंडाची रक्कम ३० दिवसात द्या
रेल्वे प्रवासादरम्यान कोचमध्ये टीटीई नसल्याने प्रवाशाला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशाला २० हजार रुपये नुकसान भरपाई व खर्चासाठी १० हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपये ३० दिवसाच्या आत देण्याचे निर्देश ग्राहक मंचाने रेल्वे विभागाला दिले आहे. ३० दिवसाच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे.