नागरी क्षेत्राच्या विकासकामांना मिळणार गती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:26+5:302021-07-01T04:21:26+5:30
गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत रखडलेल्या विकासकामांतील अडचणी दूर करून पूर्णत्वास नेण्याचे व या ...
गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत रखडलेल्या विकासकामांतील अडचणी दूर करून पूर्णत्वास नेण्याचे व या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांना दिली. यामुळे मागील तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांतील नागरी स्थानिक स्वराज संस्थांचे अनेक विकासकामे निधीअभावी मागील ३ ते ४ वर्षांपासून रखडलेली होती, तर अनेक विकासकामे प्रस्तावित होती. ही कामे मार्गी लावण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याच विषयावर मंगळवारी (दि.२९) मंत्रालयात नगरविकास मंत्र्याच्या उपस्थित बैठक पार पडली. बैठकीला खा. पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, नगर विकासाचे मुख्य सचिव, गोंदिया व भंडाऱ्याचे जिल्ह्यधिकारी, मुख्य अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत न. प.कडून प्रस्तावित कामे तसेच रखडलेल्या कामांचा आवश्यक निधी, याबाबतचा आढावा घेऊन ती कामे मार्गी लावण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.