बीअरचे बॉक्स भरलेल्या मेटॅडोरचा अपघात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:26 AM2021-03-15T04:26:58+5:302021-03-15T04:26:58+5:30
एकोडी : अदानी वीज प्रकल्पातील राख वाहून नेणाऱ्या ट्रकने कट मारल्यामुळे बीअरचे बॉक्स भरून असलेल्या मेटॅडोरचा अपघात झाला. दांडेगाव ...
एकोडी : अदानी वीज प्रकल्पातील राख वाहून नेणाऱ्या ट्रकने कट मारल्यामुळे बीअरचे बॉक्स भरून असलेल्या मेटॅडोरचा अपघात झाला. दांडेगाव शिवारात रविवारी (दि. १४) सकाळी ८.३० वाजतादरम्यान हा अपघात झाला. या अपघातानंतर मात्र मद्यशौकिनांची चांगलीच लॉटरी लागली. कित्येकांनी मेटॅडोरमधून मोठ्या प्रमाणात बीअरच्या बाटल्या लंपास केल्याचे दिसले.
सविस्तर असे की, रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा महामार्गावर गोंदियाकडून अदानी येथील राख वाहून नेणाऱ्या टिप्परने दांडेगाव शिवाराजवळ कट मारल्याने बीअरच्या बॉक्सने भरलेल्या मेटॅडोर क्रमांक एमएच २७-एक्स ४३१९ चा चालक अजय मधुकर सोनटक्के याचा वाहनावरील ताबा सुटला व मेटॅडोर उलटला. हा मेटॅडोर बीअरचे बॉक्स नागपूरकडून गंगाझरी व गोंदिया येथील वाईन शॉपमध्ये सोडण्यासाठी जात होता.
बीअरच्या बाटल्या भरलेल्या मेटॅडोरचा अपघात झाल्याची बातमी परिसरात पसरताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या तसेच घटनास्थळालगत गावातील लोकांनी गर्दी केली व आपापल्या परीने कोणी बीअरने भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स तर काहींनी खुल्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पळवून नेल्या. या अपघातामुळे गोंदिया-तिरोडा मार्गावरील वाहतूक २ तास खोळंबली होती. घटनास्थळावर गंगाझरी पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असले तरी अपघातग्रस्त मेटॅडोरमधून बीअरच्या बाटल्या पळवून नेणाऱ्या लोकांपुढे तेही निकामी ठरताना दिसले. सुदैवाने या अपघातात चालक-वाहकांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. परंतु परिसरातील शौकिनांची अपघातामुळे चांगलीच लॉटरी लॉटरी लागली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.