तंटामुक्त समितीला ठाणेदारांची आकस्मिक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 02:09 AM2017-07-06T02:09:48+5:302017-07-06T02:09:48+5:30
इटखेडा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची बैठक सुरू असताना अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार प्रशांत भस्मे यांनी आकस्मिक भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
इटखेडा : इटखेडा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची बैठक सुरू असताना अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार प्रशांत भस्मे यांनी आकस्मिक भेट दिली. तसेच तंटे सोडविण्यात प्रत्यक्ष सहभाग घेवून काही प्रकरणांचा निपटारा करण्यात सहकार्य केले.
गावखेड्यांमध्ये निर्माण होणारे तंटे आपसी सामजस्याच्या माध्यमातून सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर गठीत करण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती महत्वपूर्ण काम करीत आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या सन्मानाला ठेच न पोहोचविता समितीसमोर आलेल्या प्रकरणांवर यशस्वी तोडगा काढून तंट्यांचे निराकरण करण्यात समितीच्या सदस्यांचा मोठा सहभाग असतो. यात पोलीस विभागाचेही मोठे योगदान प्राप्त झाल्याने इटखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने अनेक प्रकरणे निकाली काढले. तसेच आपापसामध्ये शांतीपूर्ण वातावरण निर्मितीसाठी हातभार लावला आहे.
येथील तंटामुक्त गाव समितीची कार्यवाही सुरु असताना अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार भस्मे यांनी अचानक भेट देऊन समितीच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत काही प्रकरणांचा निपटारा लावण्यात आपले योगदान दिले व समितीच्या कार्याची प्रशंसा केली. आपसामधील भांडण-तंटे सामंजस्य व सौहार्दपूर्ण वातावरणात सोडविण्यासाठी किंबहुना तंटे उद्भवणार नाही, यासाठी दक्षता घेण्याबाबत तंटामुक्त समिती, अर्जदार-गैरअर्जदार यांना विशेष मार्गदर्शन केले.
सोमवारी ३ जुुलैला तंटामुक्त समितीसमोर ९ प्रकरणे आली होती. अर्जदार-गैरअर्जदार उपस्थित झाल्याने सहा प्रकरणांचा यशस्वी तोडगा काढण्यात आला. समितीचे अध्यक्ष मोरेश्वर भावे, समन्वयक व पोलीस पाटील विकास लांडगे तसेच समितीच्या सदस्यांनी ठाणेदार प्रशांत भस्मे यांचे स्वागत केले. याप्रसंगी समितीचे सदस्य पुंडलिक धोटे, विश्वनाथ गोठे, इस्तारी वासनिक, जयदेव मेश्राम, अस्मिता घोरमोडे, गुणा गोठे, यादवराव गोठे, बब्बुभाई शेख, शालिकराम सुखदेवे, पोलीस हवालदार इस्कापे, सरपंच अस्मिता वैद्य, तुुलशीदास गोंडाणे, अर्जदार-गैरअर्जदार व ग्रामस्थ उपस्थित होते.