मागणीनुसार बचतगटांनी वस्तूंचे उत्पादन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:11 AM2018-03-15T00:11:11+5:302018-03-15T00:11:11+5:30
जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. याचे सर्व श्रेय बचतगटात काम करणाऱ्या महिलांना आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. याचे सर्व श्रेय बचतगटात काम करणाऱ्या महिलांना आहे. आयसीआयसीआय आणि अलीकडेच आयडीबीआय बँकेकडून बचतगटांना मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यात आला आहे. माविमने आता बचतगटांच्या माध्यमातून ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तूंचे उत्पादन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा तेजस्विनी संमेलनात मंगळवारी (दि.१३) विशेष अतिथी म्हणून काळे बोलत होते.
अध्यक्षस्थानी माविमचे विभाग सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आयसीआयसीआय बँकेचे विक्री व्यवस्थापक संतोष पाटील, आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक विक्रम बोराडे, नॅबकिन्सचे व्यवस्थापक त्र्यंबक मगर, आॅक्सीजन सर्व्हिस प्रा.लि.चे धीरज दोनोडे यांची उपस्थिती होती.
काळे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ४१६ गावांत माविमने महिलांच्या बचतगटांची स्थापना केली आहे. लोकसंचालित साधन केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात बचत गटांच्या महिलांचे मजबूत संघटन तयार झाले आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. बचत गटांनी मिळालेल्या कर्जातून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने काम करावे. अलिकडेच झालेल्या कृषी व पलास महोत्सवाचा उपयोग बचत गटांना त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला आहे. या महोत्सवातून महिला बचत गटांना एक निश्चित शिकायला मिळाले. ग्राहकांची कोणत्या वस्तू व साहित्यांची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता, त्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे म्हणाले, जिल्हा मागास, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त असला तरी बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी एक नवी क्र ांती केली आहे. मोठ्या प्रमाणात महिलांची आर्थिक बचत सुरू असून बचतगटातील अडचणीत असलेल्या महिलांना बचतगटातील पैसा कामी पडत आहे. जिल्ह्यात ५ हजारापेक्षा जास्त महिलांचे बचतगट असून ६२ हजार महिला बचतगटांशी जुळलेल्या आहेत. अनेक बचतगटातील महिला अत्यंत प्रभावीपणे काम करीत असून त्या पशुसखी, कृषीसखी, मत्स्यसखी म्हणून आपली भूमिका पार पाडत आहेत. आयसीआयसीआय बँकेने जिल्ह्यातील बचतगटांना सुध्दा मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करून त्यांना उद्योग व्यवसायासाठी चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी नारिचेतना लोकसंचालित साधन केंद्र देवरीच्या अध्यक्ष सिध्दीकी, आधार लोकसंचालित साधन केंद्र सडक-अर्जुनीच्या अध्यक्ष ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनात लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, समुदाय साधन व्यक्ती, पशुसखी व मायक्र ो एटीएम साथी उपस्थित होत्या.
संचालन सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर यांनी केले. आभार सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेखाधिकारी योगेश वैरागडे, उपजीविका सल्लागार नामदेव बांगरे, सुशील पंचभाई, प्रिया बेलेकर, प्रफुल अवघड, एकांत वरघने यांनी सहकार्य केले.
महिला सक्षमीकरण चळवळीत योगदानासाठी सन्मानित
या वेळी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल उत्कर्ष (गोंदिया), स्वावलंबन (आमगाव), आधार (सडक-अर्जुनी), सहारा (सालेकसा), तेजस्विनी (तिरोडा), नारिचेतना (देवरी) व तेजस्विनी (गोरेगाव) या लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष व सचिवांना प्रत्येकी २५ हजार रूपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ, तसेच लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनिता चौधरी (गोंदिया), आशा दखने (आमगाव), पालिंद्रा अंबादे (सडक/अर्जुनी), शालू साखरे (सालेकसा), अनिल आदमने (तिरोडा), हेमलता वादले (देवरी) व योगिता राऊत (गोरेगाव) यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कार्याबद्दल लेखापाल, सहयोगिनी व समुदाय साधन व्यक्ती यांना बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
संवाद सत्रात महिलांना फायदा व उपयोगावर मार्गदर्शन
संमेलनानिमित्त संवाद सत्र घेण्यात आले होते. संवाद सत्रात लोकसंचालित साधन केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश, लोकसंचालित साधन केंद्राची रचना व कार्यपध्दती, लोकसंचालित साधन केंद्र कायमस्वरूपी टिकावे म्हणून कार्य करता येईल आणि कोणकोणत्या योजना/उपक्र म राबविता येईल तसेच लोकसंचालित साधन केंद्राचा महिलांना फायदा व उपयोग होतो की नाही. तसेच भविष्यात लोकसंचालित साधन केंद्राला कसे बघता येईल, या विषयाच्या अनुषंगाचे उपस्थित महिलांना पवार व सोसे यांनी मार्गदर्शन केले.
बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम
पवार म्हणाले, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्र मामुळे बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित होवून त्यांना व्यवहाराची दिशा मिळाली. या प्रशिक्षणामुळे महिलांनी कोणता उद्योग व्यवसाय निवडावा हे निश्चित केले आणि त्यादृष्टीने त्यांनी पुढील वाटचाल सुरू केली आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आज सक्षम होत आहे. बचतगटामुळे महिला संघटीत झाल्या असून त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती बदलल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांचा प्रभाव
खडसे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांना माविमने बचतगटाच्या स्थापनेतून विकासाची वाटचाल दाखिवली आहे. अनेक बचतगटातील महिला आज सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत असून त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. महिला धोरणांमुळे महिलांच्या विकासाला चालना मिळाली आहे. राज्यात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने माझी कन्या भाग्यश्री, मनोधैर्य योजना यासह अनेक महिलाविषयक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महिलाविषयक कायद्यांचीसुध्दा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
महिलांना मिळाली स्वावलंबनाची दिशा
बोराडे म्हणाले, जिल्ह्यात माविम महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करीत आहे. माविममुळे महिलांना स्वावलंबनाची दिशा मिळाली आहे. अनेक महिला आज उद्योग व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार लावीत आहेत. बँकासुध्दा बचतगटातील महिलांना कर्ज देण्यास पुढाकार घेत आहे. महिला या कर्जाची वेळीच परतफेड करीत असल्यामुळे त्यांना पुन्हा कर्ज मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.