१४ कोटींचा हिशेब गुलदस्त्यात
By admin | Published: August 3, 2015 01:30 AM2015-08-03T01:30:08+5:302015-08-03T01:30:08+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षिसे वाटली.
तंटामुक्त मोहीम : ग्रामविकास अधिकाऱ्यांना मागितली होती माहिती
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षिसे वाटली. जिल्ह्यातील ५५६ गावांना पुरस्कारापोटी १४ कोटी ७ लाख २५ हजार रुपये देण्यात आले. मात्र नियोजन पत्रिकेला डावलून खर्च करण्यात आले. शासनाने या पुरस्कराचा हिशेब मागितला होता. परंतु पुरस्कारप्राप्त अनेक गावांनी पुरस्कार रकमेचा हिशेब शासनाला दिलाच नाही.
जिल्ह्यात या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. पुरस्कारप्राप्त गावांनी बक्षीसाची रक्कम शासन निर्णयानुसार खर्च केल्या नसल्याचे दिसून येते. शासन निर्णयाप्रमाणे तंटामुक्तीच्या बक्षीस रकमेतून नवीन बांधकाम करता येत नाही असे स्पष्ट नमूद असताना देखील अनेक ग्रामपंचायतींनी नवीन ओटा बांधकाम व विहिरीच्या तोंडीचे बांधकाम केले. इतर कामासाठी असलेले पैसेही प्रचार प्रसिद्धीच्या नावाने खर्च करण्यात आले. विनियोग कार्यक्रमासाठी येणारा खर्च प्रचार प्रसिद्धीच्या रकमेतून करण्यात यावा असे स्पष्ट आदेश असताना अनेक ग्रामपंचायतींनी विनियोग कार्यक्रमासाठी खर्च केलेले पैसे पुरस्कार राशीतून खर्च केले.
शासनाने साहित्य खरेदीसाठी दरवर्षी एक ते दोन हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला दिले. तरी देखील या पुरस्कार राशीतून स्टेशनरी घेतल्याचे दाखविण्यात आले. खंड विकास अधिकाऱ्यांनी या विनियोगाच्या अहवालाचा अभ्यास न करताच तो अहवाल सरळ शासनाकडे पाठविला. गोंदिया तालुक्यातील एका ग्रामपंचायतने प्रचार प्रसिद्धीवर ३७ हजार ४०० रुपये खर्च केले. मात्र हे पैसे प्रचार प्रसिद्ध म्हणजे नेमकी कशासाठी हे नमूद केले नाही. सोबतच या पुरस्कार रकमेतून तंटामुक्त समितीचे फलक तयार करण्यावर वेगळे १५ हजार रुपये, बॅनर तयार करण्यासाठी १२०० रुपये, सुचना बोर्ड व म्हणी लिहिण्यासाठी १४ हजार ४०० रुपये खर्च केले. हा खर्च प्रचार प्रसिद्धीतूनच व्हायला पाहिजे होता. मात्र त्या ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने पुरस्कार रकमेचा विनियोग केला आहे. लेखन सामग्रीसाठी दरवर्षी पैसे देण्यात आले. तरी ग्रामपंचायतीने रेकार्ड बायडिंगसाठी १६ हजार रुपये, झेरॉक्ससाठी ३०० रुपये खर्च केले. खर्च लेखन सामुग्रीच्या पैशातून खर्च करणे गरजेचे होते. या पुरस्काराच्या रकमेचा विनियोग करताना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत प्रचार प्रसिद्धीवर पैसे खर्च केल्याचे दाखविले. मात्र प्रचार प्रसिद्धी कसली हा प्रश्न शासनाला पडला आहे. प्रचार प्रसिद्धीत मोडणारे फलक, बॅनर कार्यक्रम हे वेगळ्या निधीतुन करण्यात आले. तर प्रचार प्रसिद्धीचा पैसा गेला याचा शोध घेणे जरूरी आहे. शासन ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रणासाठी ग्राम पर्यावरण संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण करण्याचे काम सुरू आहे. तंटामुक्त मोहिमेच्या रकमेतून वृक्षारोपण करता येईल असे शासनाने नियोजन पत्रीकेत नमूद केल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केल्याचे दाखविले. मात्र पर्यावरण संतुलित योजनेंतर्गत लावलेले रोपटे व तंटामुक्त बक्षीसाच्या रकमेतून लावलेले रोपटे वेगवेगळे नाहीत ते एकच असल्याचे अनेक ग्रामपंचायतींकडून लक्षात येत आहेत.
शासनाने गावाचा विकास करण्यासाठी लाखो रुपये प्रत्येक गावाला वाटले. मात्र नियोजन पत्रीकेचा अभ्यास न करताच पैशाचा वापर केला. शासनाने पुरस्काराच्या विनियोगाचा हिशेब मागितला होता. परंतु अनेक गावांनी पुरस्कार रकमेचा हिशेबच दिला नाही. (तालुका प्रतिनिधी)