जागृती पतसंस्थेच्या खातेदारांचा मुख्य प्राधिकृत अधिकाऱ्यांवर रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:11+5:302021-03-20T04:27:11+5:30
तिरोडा : तालुक्यातील बहुचर्चित जागृती सहकारी पतपुरवठा संस्थेची (मुंडीकोटा) सर्वसाधारण सभा आदर्श आदिवासी जंगल सोसायटीच्या सभागृहात बुधवारी पार पडली. ...
तिरोडा : तालुक्यातील बहुचर्चित जागृती सहकारी पतपुरवठा संस्थेची (मुंडीकोटा) सर्वसाधारण सभा आदर्श आदिवासी जंगल सोसायटीच्या सभागृहात बुधवारी पार पडली. यात जागृती सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी मुख्य प्राधिकृत अधिकाऱ्यांवर चांगलाच रोष व्यक्त केला.
शासकीय नियमानुसार वर्ष २०१९-२० ची २५ वी सर्वसाधारण सभा ही अहवाल वाचनानंतर ग्राहकांनी केलेल्या गोंधळामुळे गाजली. ग्राहकांचा सर्व रोष संस्थेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी पी.एच. मेश्राम यांच्यावर होता. जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून सहायक उपनिबंधक (श्रेणी-१) मेश्राम यांची नियुक्ती जागृती पतसंस्थेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी म्हणून केली होती. सहा महिन्यांपर्यंत मेश्राम यांनी पदभार स्वीकारला नाही. सरतेशेवटी जिल्हा उपनिबंधकांनी तालुका उपनिबंधक प्रमोद हुमने यांना पदभार दिला. परंतु, दोन महिन्यांत त्यांची बदली झाली व मागील सात महिन्यांपासून मेश्राम हे पदभार सांभाळत आहेत. पदभार सांभाळल्यानंतर ग्राहकांच्या हितासाठी कुठलीही भरीव कामगिरी मुख्य प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केली नसल्याचा आरोप ग्राहकांनी आमसभेत केला. तिरोडा शहरातील आरआरसीच्या ११ पैकी एकाही प्रकरणाची अंमलबजावणी केली नाही. जिल्हा उपनिबंधकांनी मेश्राम यांच्या मदतीकरिता आठ सहायक प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना विश्वासात न घेता ही सभा घेण्यात आली. कोरोनाच्या नावाखाली सभासदांना सभेची नोटीस बजावण्यात आली नाही. संस्था डबघाईस आली असताना ग्राहकांना त्यांचे पैसे परत न करता कर्मचाऱ्यांना अडीच लाख रुपये स्वतः निर्णय घेऊन दिले. याकरिता सहायक प्राधिकृत अधिकाऱ्यांशी विचारणा केली गेली नाही. संस्थेचे सर्व रेकॉर्ड तिरोडा पोलिसांनी जप्त केले असून संस्थेत कुठलेही काम सुरू नसताना १२ कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मानधनावर परस्पर नियुक्त केले.
......
तिरोडा शाखेला ठोकले सील
तिरोडा नगरपालिकेचा करभरणा न केल्याने संस्थेच्या कार्यालयास तिरोडा नगरपालिकेने कुलूप ठोकले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी वर्ष २०१९-२० लेखापरीक्षणाचे आदेश दिले असून कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांना कुठलेही कागदपत्र मुख्य प्राधिकृत अधिकाऱ्यांनी उपलब्ध न करून दिल्याने अद्याप २०१९-२० चे लेखापरीक्षण होऊ शकले नाही. या लेखापरीक्षणात अनेक घोळ समोर येण्याची शक्यता आहे. मेश्राम हे कुणाच्या सांगण्यावरून टाळाटाळ करीत आहेत, यांचा बोलवता धनी कोण आहे? संस्थेच्या संबंधित कुठल्याही कागदपत्रांवर मेश्राम सही करीत नाहीत.
.....
सभासदांच्या याद्या तयार नाही
प्रशासकाचा कारभार संपून निवडणूक घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपली असतानासुद्धा अद्याप सभासदांची अद्ययावत यादी संस्थेकडे उपलब्ध नाही. कर्जवसुलीकरिता कर्मचारी नसल्याचे सांगून वसुलीसाठी कर्जदारांना नोटिसा अद्याप बजावण्यात आल्या नाहीत.
.......
७८ दिवसांत फक्त पाच आरोपींना अटक
जागृती सहकारी पतसंस्था ही संचालक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे बुडीत निघाली आहे. सहा हजार ग्राहकांचे जवळपास ३१ कोटी रुपये बुडीत निघाले आहेत. संचालक मंडळ व कर्मचारी अशा एकूण २८ आरोपींविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल होऊन मागील ७८ दिवसांत २८ पैकी केवळ पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.