लेखापालाला १५ हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:39 AM2021-02-27T04:39:43+5:302021-02-27T04:39:43+5:30
गोरेगाव येथील एका व्यापाऱ्याकडून त्यांच्या राईस मिलमध्ये धान मिलींग व प्रोसेसिंग करण्याकरिता राईस मिल व्यापाऱ्याशी करारनामा केला आहे. धान ...
गोरेगाव येथील एका व्यापाऱ्याकडून त्यांच्या राईस मिलमध्ये धान मिलींग व प्रोसेसिंग करण्याकरिता राईस मिल व्यापाऱ्याशी करारनामा केला आहे. धान मिलींग व प्रोसेसिंग करण्याकरिता आवश्यक असलेला परवाना तयार करण्याकरिता व्यापाऱ्याने जानेवारीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव येथे जावून दीपक गायधने यांना भेटून आवश्यक कागदपत्रांची माहिती घेतली. त्यावेळी गायधने यांनी व्यापाऱ्याशी संपर्क करून कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर ७ जानेवारी रोजी २०२१ रोजी व्यापाऱ्याने गायधने याच्याशी बोलणी केली. तेव्हा गायधनेने व्यापाऱ्याला ३० हजारांचा धनादेश व १० हजार रुपये रोख रक्कम लागेल, असे सांगितले. ३० हजार रुपयांचा धनादेश कृषी उत्पन्न बाजार समिती, गोरेगाव या नावाने देण्याचे सांगून १० हजार रुपये रोख द्या, पण त्याची पावती मिळणार नाही, असे सांगितले. यासंदर्भात व्यापाऱ्याने ११ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदविली. पडताळणी दरम्यान गायधने यांनी व्यापाऱ्याला धान मिलींग व प्रोसेसिंग परवाना देण्यासाठी कर स्वरूपात २० हजार रुपयांचा धनादेश व लाच म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडले. गोरेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे यांनी केली.