खातीटोल्यातील नळ योजना कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:14+5:302021-05-23T04:28:14+5:30
गोंदिया : तालुक्यातील ग्राम खातीटोला येथे १३ वर्षांपूर्वी ३ लाख १५ हजार रूपये खर्चून नळयोजना तयार करण्यात आली. मात्र ...
गोंदिया : तालुक्यातील ग्राम खातीटोला येथे १३ वर्षांपूर्वी ३ लाख १५ हजार रूपये खर्चून नळयोजना तयार करण्यात आली. मात्र या योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांना अद्याप थेंबभर पाणी मिळाले नसल्याने ग्रामस्थांसाठी ही नळयोजना केवळ दीपास्वप्न ठरली आहे. त्यामुळे शासनाचा निधी वाया गेला असून नागरिकांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
खातीटोला गावची लोकसंख्या ७५० असून सन २००६-२००७ मध्ये जिल्हा परिषदेने ३ लाख १५ हजार रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने ही योजना तत्कालीन सरपंचाच्या प्रयत्नातून मंजूर झाली होती. त्याकरिता त्यांनी वारंवार जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता. या योजनेंतर्गत खातीटोला (झालूटोला) येथे १५ हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली. आता गावात नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण होते. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक अद्याप त्या टाकीत पाण्याचा एक थेंब देखील गेला नाही. योजना पूर्णत्वास आली तेव्हापासून ही टाकी कोरडीच आहे. यामुळे नागरिकांच्या अपेक्षांवर विरजण पडले. परिणामी आता नागरिकांना हातपंप आणि विहिरींच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते आहे. सध्या हातपंप देखील कोरडे पडल्याने गावात पाणीटंचाई आहे. शासनाचा निधी वाया गेल्यामुळे नागरिकांत असंतोष आहे. तातडीने ही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणून नळद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.