शहरातील मालमत्तेचे होणार अचूक मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:00:39+5:30
शहरातील एकूण मालमत्तेचे अचूक मोजमाप करुन किती मालमत्ता आहे. शिवाय भविष्यात शहराचा विकास करण्यासाठी काय वाव आहे. शासकीय जमीन किती आहे. किती मालमत्ताधारकांनी त्यांच्या धारण क्षेत्रापेक्षा अधिक अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. तसेच रेकार्डवर कमी बांधकाम दाखवून प्रत्यक्षात अधिक बांधकाम करुन नगर परिषदेचा मालमत्ता कर बुडवित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या महसूल विभागाने गोंदिया शहराच्या सीटी सर्व्हे करण्याला २७ जुलै रोजी मंजुरी दिली आहे. भूमिअभिलेख विभागाच्या माध्यमातून शहरातील मालमत्तेचे अचूक मोजमाप केले जाणार आहे.४० महिन्यांच्या कालावधी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामुळे शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण सुध्दा उघडकीस आणण्यास मदत होणार आहे.
शहरातील एकूण मालमत्तेचे अचूक मोजमाप करुन किती मालमत्ता आहे. शिवाय भविष्यात शहराचा विकास करण्यासाठी काय वाव आहे. शासकीय जमीन किती आहे. किती मालमत्ताधारकांनी त्यांच्या धारण क्षेत्रापेक्षा अधिक अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. तसेच रेकार्डवर कमी बांधकाम दाखवून प्रत्यक्षात अधिक बांधकाम करुन नगर परिषदेचा मालमत्ता कर बुडवित आहे. या बाबी पुढे येण्यास सीटी सर्व्हेमुळे मदत होणार आहे. सध्या गोंदिया शहरात एकूण ९ हजार मालमत्ताधारक आहे. तर सीटीसर्व्हेमुळे ही संख्या ३० हजारावर पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे नगर परिषदेच्या मालमत्ता करात सुध्दा वाढ होणार आहे. जेवढे मालमत्ताधारक अधिक तेवढेच अधिक उत्त्पन्न प्राप्त होण्यास मदत होणार आहे. शिवाय गोंदिया शहरात मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणाची समस्या भेडसावित आहे. शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर अतिक्रमण करुन रस्ते अरुंद केले आहे. शहरातील बाजारपेठेच्या भागात ही समस्या आहे. मात्र सीटी सर्व्हे दरम्यान किती जणांनी रस्त्यावर आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे ही बाब सुध्दा उघड होण्यास मदत होणार आहे. मालमत्ताधारकांना सुध्दा त्यांच्या मालमत्तेचे अचूक मोजमाप होवून आखीव पत्रिका मिळणार आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी विक्री करण्यातील त्रृटी दृूर करण्यास सुध्दा याची महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरुन भूमिअभिलेख विभागातंर्गत ४० महिन्यांच्या कालावधी सीटी सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
टाऊन प्लानिंग करताना पडणार उपयोगी
शहराचा वाढता विस्तार आणि विकासाकरिता दर दहा वर्षांनी टाऊन प्लानिंग केली जाते. यात शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो. टाऊन प्लानिंग करताना सीटी सर्व्हेतील नोंदीची फार मदत होत असते. बरेचदा टाऊन प्लानिंगमधील काही गोष्टीत सुध्दा यामुळे बदल करण्यास मदत होत असल्याचे टाऊन प्लानिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ड्रोनव्दारे करणार मोजमाप
शहराचा सीटी सर्व्हे करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाला जवळपास चाळीस महिन्याचा कालावधी लागणार आहे. यासाठी भूमिअभिलेख विभाग ड्रोनची सुध्दा मदत घेणार आहे. याकरिता एका सर्व्हे करणाऱ्या कंपनीची निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेसाठी ४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याची पहिली ९० लाख रुपयांची किस्त नगर परिषदेने भूमिअभिलेख विभागाकडे जमा सुध्दा केली आहे.
गोंदिया शहरातील मालमत्तेचे अचूक मोजमाप होवून नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होवून शहर विकासाला गती मिळावी यासाठी २०१८ मध्येच महसूल व नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हाच त्यांनी याला मंजुरी दिली होती. मात्र निधीमुळे हा प्रस्ताव रखडला होता. पण आता ही अडचण दूर झाली असून सीटी सर्व्हे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याची शहराच्या विकासासाठी निश्चित मदत होईल.
- गोपालदास अग्रवाल,
माजी आमदार.
कृषक जमीन अकृषक करण्यास पायबंद
शहरात मागील काही दिवसांपासून कृषक जमिनी अकृषक करुन त्यावर प्लाट तयार करुन विक्री केली जात आहे. तर एकाच प्लाटच चार पाच जणांना विक्री केली जात असल्याचे प्रकार सुध्दा यापुर्वी उघडकीस आले आहे. यामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र सीटी सर्व्हेमुळे भूमिमाफीयांकडून नागरिकांची होणार दिशाभूल टाळण्यास मदत होणार आहे. तसेक कृषक जमीन अकृषक दाखविण्याच्या प्रकाराला सुध्दा यामुळे पायबंद लावणे शक्य होणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.