'त्या' दुहेरी हत्याकांडाचा पेच सुटला, आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 12:11 PM2022-01-24T12:11:23+5:302022-01-24T18:29:01+5:30
नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता.
गोंदिया : नागपूरच्या खोब्रागडे नगरातील संदीप प्रसन्नकुमार मिश्रा (५६)) व पटगोवरी येथील जयवंता टीकाराम भगत (४५) या दुहेरी हत्याकांडाचा पेच सुटला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन विधिसंघर्षीत बालकांसह चौघांना अटक केली आहे.
१९ जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रामटेक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यासंदर्भात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत नागपूरच्या खोब्रागडे नगरातील संदीप मिश्रा असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याचा खून कुणी केला यासंदर्भात माहिती मिळाल्यावर पोलिसांनी २० जानेवारी रोजी सालेकसा तालुक्यातील ग्राम सिंधीटोला येथील संशयित आरोपी महेश भैयालाल नागपुरे (४१) याला ताब्यात घेतले. त्याने या प्रकरणात एक पुरुष, एक महिला व मुलाचा समावेश असल्याचे सांगीतले. मृत संदीप मिश्रा सोबत राहणाऱ्या जयवंता भगत बेपत्ता असल्यामुळे त्यांच्यासंदर्भात विचारणा केल्यावर आरोपी महेश नागपुरे याने जयवंताची हत्या करून तिचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात रस्त्यालगत फेकल्याचे सांगितले.
या संदर्भात भंडारा जिल्ह्यातील करडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी आरोपी महेश नागपुरे, मरकाखांदा येथील रीता धनराज बागबांधे (३२) व दोन विधिसंघर्षीत बालकांना अटक करून रामटेक पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पुलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, जावेद शेख, गजेंद्र चौधरी, नाना राऊत, विनोद काळे, विपीन गायधने, शैलेष यादव, रोहन डाखोरे, प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, सतीश राठोड, सुमेध तायडे, साइबर सेलच्या संगीता वाघमारे, साहेबराव बहाले, अमोल कुथे यांनी केली आहे.