गरोदर महिलेचा खून करणाऱ्या आरोपींना अटक
By admin | Published: July 1, 2014 01:33 AM2014-07-01T01:33:25+5:302014-07-01T01:33:25+5:30
काटी ते बघोेलीदरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ एका २५ वर्षीय गरोदर महिलेचा गळा आवळून खून होण्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. त्या महिलेला झाडावर गळफास लावलेल्या
दोन बायकांचा मामला : पती व सवतीच्या वडिलांचे कृत्य
रावणवाडी : काटी ते बघोेलीदरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ एका २५ वर्षीय गरोदर महिलेचा गळा आवळून खून होण्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. त्या महिलेला झाडावर गळफास लावलेल्या अवस्थेत लटकविण्यात आले होते. त्यावेळी त्या मृत महिलेची ओळखही पटली नव्हती. अखेर या हत्येचा उलगडा करण्यात रावणवाडी पोलिसांना यश आले असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना १४ जूनच्या रात्रीदरम्यान घडली होती. रावणवाडी पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवून या हत्याकांडातील दोन आरोपींना रविवारी (दि.२९) बालाघाट जिल्ह्याच्या रामपायली येथून अटक केली. रविशंकर चचाणे (३०) रा. बालाघाट व आसाराम तांगशे (६५) रा. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर याला दोन पत्नी होत्या. पहिली पत्नी आसाराम तांगशे याची मुलगी होती. दुसरी पत्नी रोशनी ही आठ ते नऊ महिन्यांची गर्भवती होती. रोशनीला संपविण्यासाठी तिचा पती रविशंकर व पहिल्या पत्नीचे वडील आसाराम तांगशे या दोघांनी कट रचला होता. या दोघांनी कट रचून रोशनीच्या गळ्याला केबलने आवळून तिचा खून केला. यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने व आत्महत्या सिद्ध करण्यासाठी तिचा मृतदेह एका वृक्षावर टांगण्यात आला.
ही घटनेचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले. तपास कार्य व आरोपींना पकडण्यासाठी रावणवाडी पोलिसांनी चार-चार शिपायांच्या पाच चमू तयार केल्या होत्या. तपासादरम्यान त्या महिलेचा पतीच रोशनीचा खुनी असल्याचे पोलिसांना कळले. यानंतर आरोपींच्या शोधात रावणवाडी पोलीस बालाघाट जिल्ह्यातील रामपायली येथे गेले. तेथून पोलिसांनी आरोपी रविशंकर चचाणे व आरोपी आसाराम तांगशे या दोघांना अटक केली.
आरोपींना पकडण्यासाठी रावणवाडीचे पोलीस निरीक्षक निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक शेळके, पोलीस हवालदार रहांगडाले, पोलीस हवालदार येळे, देशपांडे यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)