जांभळी हत्याकांडातील आरोपी पीसीआरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2016 01:31 AM2016-08-05T01:31:55+5:302016-08-05T01:31:55+5:30
जवळच्या सिलेझरी येथील निलेश उर्फ देवानंद गोपाल गोपे या ३२ वर्षीय विवाहित युवकाची गोरेगाव तालुक्यातील ...
बोंडगावदेवी : जवळच्या सिलेझरी येथील निलेश उर्फ देवानंद गोपाल गोपे या ३२ वर्षीय विवाहित युवकाची गोरेगाव तालुक्यातील जांभळी जंगल शिवारात धारदार शस्त्राने मारून हत्या केल्याची घटना रविवारी (दि.३१) उघडकीस आली. या प्रकरणाती गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन युवकांना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
या हत्याकांडातील मुख्य आरोपी बोंडगावदेवी येथील सचिन शालीकराम बोरकर (२५) व देवलगाव (नवेगावबांध) येथील देवेंद्र दामा शिवणकर हे आहेत. सिलेझरी येथील युवकाच्या या हत्याकांडामध्ये आणखी कोणी आरोपी आहेत का, याकडे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. एका खेडेगावातील साध्याभोळ्या विवाहीत युवकाला दुसऱ्या तालुक्यातील जंगल शिवारात नेऊन मोठ्या क्रूरपणे मारण्यात आले.
शनिवारी (दि.३०) सिलेझरी निवासी देवानंद गोपे हा आपला चुलत भाऊ कानेश यांच्यासोबत भाजीपाला आणण्यासाठी सानगडीला गेला होता. संध्याकाळी मोटारसायकलने बोंडगावदेवीचा सचिन बोरकर व त्याच्या एक मित्र सानगडीला आले. सायंकाळच्या देवानंदला एका गावावरून येवू असे म्हणून तिघेही निघून गेले. त्याच रात्री जांभळी जंगल शिवारात त्याची हत्या करण्यात आली. सोमवारला मृतदेहाची ओळख पटवून देवानंदच्या नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी भादंवि कलम ३०२,२०१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)