'तारीख पे तारीख'मुळे फिर्यादीचा संताप, न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 06:26 PM2022-02-05T18:26:25+5:302022-02-05T18:45:37+5:30
चेक बॉऊन्स प्रकरणात न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात होती. या प्रकरणात कंटाळलेल्या फिर्यादीने चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावून आपला राग व्यक्त केला.
गोंदिया : चेक बॉऊन्स प्रकरणात न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात होती. या प्रकरणात कंटाळलेल्या फिर्यादीने चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावून आपला राग व्यक्त केला. ही घटना ५ फेब्रुवारी दुपारी १.१० वाजता गोंदियाच्या जिल्हा न्यायालयातील पाचवे सहदिवाणी न्यायाधीश, क स्तर यांच्या न्यायालयात घडली. रवी शंकरराव काकडे (४७, रा. शक्ती मंदिरजवळ, सूर्याटोला, गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
रवी काकडे यांनी एका शिक्षकाला चार वर्षांपूर्वी ४ लाख रुपये उसनवारीवर दिले होते. त्या बदल्यात त्या शिक्षकाने त्याला धनादेश दिला होता; परंतु तो वटला नाही. चेक बॉऊन्सचे प्रकरण रवी काकडे यांनी न्यायालयात दाखल केले. गोंदिया जिल्हा न्यायालयातील पाचवे सहदिवाणी न्यायाधीश, क स्तर यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. शनिवारी न्यायालयात सुनावणी सुरू असताना आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.
चेक बॉऊन्स प्रकरणात मला चार वर्षांपासून तारीख पे तारीख दिली जात आहे. मी चेक बाॅऊन्स प्रकरणात फिर्यादी असून, पेशीच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मी न्यायालयात बसून राहतो आणि चेक बॉऊन्सचा आरोपी न्यायालयात येऊन पाच मिनिटात तारीख घेऊन निघून जातो. याचा संताप व्यक्त करीत त्याने चक्क न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली. घटना घडताच शहर पोलिसांनी जिल्हा न्यायालय गाठले. रवी काकडे याच्यावर सीआरपीसी २०० प्रमाणे तक्रार घेऊन न्यायालयाच सीआरपीसी कलम २९० प्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. उशिरापर्यंत रवी काकडे हा न्यायालयाच्या ताब्यात होता.