कुऱ्हाडीने घाव घालून पतीचा खून करणाऱ्या आरोपी पत्नीला आजन्म सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:58 PM2024-10-04T15:58:17+5:302024-10-04T15:59:53+5:30

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : सदोष तपासामुळे एकाची निर्दोष

Accused wife who killed her husband by wounding him with an ax gets rigorous imprisonment for life | कुऱ्हाडीने घाव घालून पतीचा खून करणाऱ्या आरोपी पत्नीला आजन्म सश्रम कारावास

Accused wife who killed her husband by wounding him with an ax gets rigorous imprisonment for life

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
परपुरुषांशी संबंध ठेवून नवऱ्याला कुऱ्हाडीने घाव घालून ठार करणाऱ्या पत्नीला जिल्हा सत्र न्यायालयाने ३ ऑक्टोबर रोजी आजन्म सश्रम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली. शारदा मुनेश्वर पारधी (वय २८) रा. बघोली असे आरोपी महिलेचे नाव आहे.


दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम बघोली येथील मुनेश्वर सहेसराम पारधी (वय ३२) या तरुणाला कुन्हाडीने घाव घालून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ३ वाजता दरम्यान ठार करण्यात आले. आरोपी शारदा पारधी हिचे गावातील कृणाल मनोहर पटले (२२) रा. बघोली याच्याशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातून मुनेश्वर व कृणाल आणि शारदा यांच्यात वाद झाला होता. शारदाला कृणालसह पकडल्यामुळे कृणालवर विनयभंगाचा गुन्हा दवनीवाडा पोलिसात दाखल होता. 


हे प्रकरण ताजे असताना शारदाने आपल्या प्रियकराच्या प्रेमासाठी झोपेत असलेल्या नवऱ्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केला होता. या प्रकरणात दवनीवाडा पोलिसांनी शारदा मुनेश्वर पारधी (२८) व कृणाल मनोहर पटले (२२) दोन्ही रा. बघोली यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 


या प्रकरणाची ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी करताना आरोपी शारदाला आजन्म सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड सुनावण्यात आले. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी काम पाहिले. 


१४ साक्षीदार तपासले 
मुनेश्वर सहेसराम पारधी (३२) यांच्या खुनाच्या प्रकरणात न्यायालयासमोर १४ साक्षीदार सादर करण्यात आले. त्या साक्षीदारांनी न्यायालयासमोर आपली साक्ष नोंदविली. न्यायलयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी श्रीकांत मेश्राम यांनी काम पाहिले.


सदोष तपासामुळे कृणाल झाला निर्दोष 
या प्रकरणाचा तपास त्यावेळी ठाणेदार प्रताप भोसले यांनी केला होता. भोसले यांच्या सदोष तपासामुळे आरोपी कृणाल मनोहर पटले (२२) याला संशयाचा फायदा मिळाला अन् त्याची निर्दोष सुटका झाली.


"या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सदोष तपास केला होता. योग्य पुराव्याच्या आधारे आरोपीची निर्दोष मुक्तता करता येत नाही या आधारावर न्यायालयाने आरोपी शारदा पारधी हिला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे न्यायालयावरील जनतेचा विश्वास अजून वाढला आहे. "
- कृष्णा पारधी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गोंदिया

Web Title: Accused wife who killed her husband by wounding him with an ax gets rigorous imprisonment for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.