धान खरेदीसाठी दुग्ध शीतकरण केंद्राची इमारत अधिग्रहित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:25+5:302021-06-06T04:22:25+5:30
साखरीटोला : येथे आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केली जाते.धान ठेवण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने रब्बी हंगामातील ...
साखरीटोला : येथे आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केली जाते.धान ठेवण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्यात आली नाही. राज्य शासनाने शासकीय इमारती अधिग्रहित करून धान खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत रिकामी असून ती धान खरेदीसाठी अधिग्रहित करण्याची मागणी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी केली आहे.
याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी आमदार सहषराम कोरोटे, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह चर्चा सुद्धा केली आहे. यावर त्यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ही इमारत अधिग्रहित
करण्याचे आश्वासन दिले. रब्बीतील धानाची कापणी आणि मळणी देखील पूर्ण झाली आहे. अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी बियाणे, खते आणि मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करा या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. साखरीटोला येथील मुख्य मार्गावर शासकीय दूध शीतकरण केंद्राची मोठी इमारत अनेक वर्षांपासून रिकामी पडली आहे. तेथील साहित्य विभागाने पूर्वीच काढून घेतले आहे. इमारत व्यवस्थित असून हजारो क्विंटल धान या इमारतीत ठेवले जाऊ शकते. तसेच शेतकऱ्यांची समस्या सुद्धा दूर होऊ शकते.