कोविड केअर सेंटरसाठी आणखी ११ इमारतींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:26 AM2021-04-12T04:26:37+5:302021-04-12T04:26:37+5:30
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस भयावह रूप घेत असून, बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशात कोविड केअर सेंटरमध्ये ...
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस भयावह रूप घेत असून, बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशात कोविड केअर सेंटरमध्ये बाधितांची संख्या वाढत चालली असून, सेंटर्स आता फुल्ल होताना दिसत आहेत. अशात बाधितांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने आरोग्य विभागाने आणखी ११ इमारतींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, त्यानुसार आता आणखी आठ इमारतींचे अधिग्रहण करून तेथे कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. विशेष म्हणजे, गोंदिया शहर व तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट असतानाच आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. परिणामी ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, शनिवारी जिल्ह्यात ३९५६ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली असतानाच यातील २९१३ अलगीकरणात असल्याची नोंद आहे. मात्र अलगीकरणात असलेल्या व्यक्तींपासून अन्य व्यक्तींना कोरोनाचा धोका होऊ शकतो. अशात बाधितांची सोय व्हावी म्हणून जिल्ह्यात सध्या नऊ कोविड केअर सेंटर्स सुरू आहेत.
मात्र या सेंटर्समध्ये रुग्णांची संख्या वाढून त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी. तसेच दिवसेंदिवस वाढत असलेली बाधितांची संख्या बघता पुढील तयारी म्हणून आरोग्य विभागाने आणखी ११ इमारतींचे कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, या इमारतींचे आता अधिग्रहण केले जाणार आहे. म्हणजेच, जिल्ह्यात आता आणखी ११ कोविड केअर सेंटर सुरू होणार असून, बाधितांच्या सोयीसाठी ही व्यवस्था केली जात आहे.
------------------------------
मुर्री येथील निवासी शाळेचे अधिग्रहण
शहरात पॉलिटेक्निक कॉलेज व जिल्हा क्रीडा संकुल येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र या दोन्ही सेंटर्समध्ये बाधितांची संख्या वाढत असून, आताच अर्धेअधिक बेड्स भरले आहेत. अशात बाधितांची गैरसोय होऊ नये म्हणून लगतच्या ग्राम नंगपुरा मुर्री येथील अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा इमारतीचे अधिग्रहण केले जाणार आहे.
---------------------------
या इमारतींचे होणार अधिग्रहण
कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील ११ इमारतींचे अधिग्रहण केले जाणार आहे. यामध्ये अर्जुूनी-मोरगाव येथील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह, एस.एस. जायस्वाल कॉलेज मागील सभागृह, ग्राम देवलगाव येथील नत्थुजी पुस्तोडे अनुदानित आश्रमशाळा; सडक-अर्जुनी तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह, ग्राम घटेगाव येथील आरोग्य उपकेंद्र इमारत, ग्राम सिंदीपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह; गोंदिया तालुक्यातील ग्राम नंगपुरा मुर्री येथील अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा; आमगाव तालुक्यातील भवभूती महाविद्यालय मुलींचे वसतीगृह; गोरेगाव तालुक्यातील ग्राम घोटी येथील विमुक्त जाती भटक्या जमाती माध्यमिक आश्रमशाळा तसेच तिरोडा येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्था इमारतीचा समावेश आहे.