‘खर्चापाणी’ मागणाऱ्या ३९ जणांवर कारवाई
By admin | Published: December 30, 2015 02:23 AM2015-12-30T02:23:43+5:302015-12-30T02:23:43+5:30
खर्चापाणीच्या नावावर लाच मागणाऱ्या ३९ जणांवर यावर्षी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना पकडले आहे.
एसीबीसाठी २०१५ ठरले भरभराटीचे : ४८ आरोपींवर एसीबीचा दणका
गोंदिया : खर्चापाणीच्या नावावर लाच मागणाऱ्या ३९ जणांवर यावर्षी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना पकडले आहे. या ३९ कारवायांत ४८ आरोपी असून एसीबीच्या या दणक्याने जिल्हाभरात आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवायांचा हा आकडा आता दिवसेंदिवस वाढतच चालला असून सन २०१५ हे वर्ष एसीबीसाठी भरभराटीचेच ठरल्याचे दिसून येते.
काम करण्यासाठी टेबलाच्या खालून खर्चापाणी किंवा मिठाईच्या नावावर पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. आजघडीला पैशांच्या या देवाण-घेवाणीची एक परंपराच निर्माण झाली आहे. चपराशा पासून ते अधिकाऱ्यांपर्यंत, एवढेच काय लोकसेवकही आता पैशांची मागणी करू लागल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. लाचखोरीच्या या प्रकारांवर आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. हा विभाग अशा या लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्य करतो.
लाचखोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोंदियात सन २००९ पासून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीचा सन २०१३ पर्यंतचा काळ विभागासाठी तेवढा अनुकूल ठरला नाही. मात्र सन २०१४ पासून विभागाने यशाची पायरी चढण्यास सुरूवात केली. सन २०१४ मध्ये विभागाने २७ कारवाया केल्या आहेत. यामध्ये ३० आरोपीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
सन २०१५ हे वर्ष मात्र एसीबीसाठी चांगलेच भरभराटीचे लाभले असल्याचेही दिसून येत आहे. कारण गोंदियात कार्यालय सुरू झाल्यापासून यंदा एसीबीने सर्वाधीक ३९ कारवाया केल्या आहेत. या ३९ कारवायांत पथकाने ४८ जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई सुरू आहे. म्हणजेच यावर्षी १२ कारवायांची वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गोंदिया पथकाने केलेल्या या कारवायांसह भंडारा पथकाने जिल्ह्यात तीन कारवाया केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)