तंबाखू विक्रेत्या ७ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:29 AM2021-03-17T04:29:50+5:302021-03-17T04:29:50+5:30
गोंदिया : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन नुकतेच डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत गावांमधील ...
गोंदिया : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन नुकतेच डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत गावांमधील तंबाखू विक्रेत्या ७ जणांवर कोटपा कायदा २००३ अंतर्गत आरोग्य व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या कारवाई केली.
कोटपा कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार सार्वजनिक क्षेत्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी, कलम ५ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम ६ (अ) नुसार अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा व कलम ६ (ब) नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी तसेच कलम ७ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनवर धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्थानक, दवाखाना, शाळा-महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय-अशासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणी तसेच शाळा व दवाखाना यांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (खर्रा-गुटखा-पान मसाला) विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत, डुग्गीपार पोलीस व आरोग्य विभागाने कलम ५ व कलम ६ (अ) अंतर्गत २० पानटपऱ्यांवर धाड मारून ७ जणांवर कारवाई केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, मनोवैज्ञानिक सुरेखा मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, तार्केश उके, विवेकानंद कोरे तसेच पोलीस निरीक्षक डुग्गीपार यांच्या मार्गदर्शनात पोलीस घनश्याम उइके व नेमराज कुरसुंगे यांनी ही कारवाई केली.