पीक कर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या बँकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:36+5:302021-07-08T04:19:36+5:30
गोंदिया : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात माघारलेल्या दोन राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई करीत या बँकांमधून शासकीय खाते बंद ...
गोंदिया : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात माघारलेल्या दोन राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई करीत या बँकांमधून शासकीय खाते बंद करण्याची कारवाई जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या निर्देशावरून करण्यात आली. तसेच इतर बँकांनीसुध्दा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. ५) घेण्यात आलेल्या बॅंक अधिकाऱ्यांच्या पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. काही राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची कर्ज वाटपाची टक्केवारी अतिशय कमी असल्यामुळे त्यावर नाराजी व्यक्त करून कामगिरी सुधारण्याची ताकीद बँकांना दिली. सर्व पात्र शेतकऱ्यांनी पीक कर्ज विहीत मुदतीत परतफेड करून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून घ्यावे. १५ जुलैच्या आत पीक विमासुध्दा काढावा, असे आवाहनही त्यांनी केले. पीक कर्जाबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच काही अडचणी असल्यास जिल्हा प्रबंधक अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
------------------------
जिल्हा बँकेची आघाडी कायम
जिल्ह्यात व्यापारी बँकांनी २४.६३ टक्के, ग्रामीण बँकांनी ५६.८४ टक्के आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८०.२३ टक्के कर्ज वाटप केले असून, शनिवारपर्यंत (दि. ३) जिल्ह्याची एकूण टक्केवारी ५९.५१ टक्के आहे. मात्र, २ बँकांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याने दोन्ही बँकेतील सर्व विभागांची शासकीय खाती इतर बँकांमध्ये वर्ग करण्याबाबत जिल्हाधिकारी खवले यांनी निर्देश दिले.