नऊ प्लास्टीक विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:30 PM2018-07-27T23:30:31+5:302018-07-27T23:31:21+5:30
प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने शहरातील पुन्हा नऊ व्यापाऱ्यांवर कारवाई केली. यात मंगळवारी (दि.२४) शहरातील व्यापारी तर गुरूवारी (दि.२६) एका व्यापाऱ्यावर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने शहरातील पुन्हा नऊ व्यापाऱ्यांवर कारवाई केली. यात मंगळवारी (दि.२४) शहरातील व्यापारी तर गुरूवारी (दि.२६) एका व्यापाऱ्यावर कारवाई केली. या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एकूण ४५ हजार रूपयांचा दंड नगर परिषदेच्या पथकाने ठोठावला. तसेच त्यांच्याकडील प्लास्टीक साहित्य जप्त केले.
मागील काही दिवसांपासून शहरात मंदावलेली प्लास्टीक बंदीची मोहिम आता हळूहळू जोर धरू लागली आहे. नगर परिषदेच्या पथकाने प्लास्टीक बंदीची कारवाई करीत मंगळवारी (दि.२४) शहरातील आठ व्यापाऱ्यांना दणका देत ४० हजार रूपयांचा दंड ठोठावला. यात पथकाने बाजारातील सीता थे्रड, कन्हैया कटलरी, भागचंद ककवानी कटलरी, आशू प्लास्टीक, ज्योती ट्रेडींग, मनोज ट्रेडर्स, विकास असाटी प्लास्टीक व जय भोले हॉटेलवर कारवाई केली. त्यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे ४० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर गुरूवारी (दि.२६) पथकाने शहरातील कंवरराम बेकरीवर कारवाई केली. या कारवाईतही बेकरीवर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दोन दिवसाच्या कारवाईत पथकाने नऊ व्यापाऱ्यांना दणका देत त्यांना ४५ हजार रूपयांचा दंड ठोठावला.
कारवाई करणाऱ्या पथकात कनिष्ठ अभियंता सुमेध खापर्डे, उमेश शेंडे, स्वच्छता निरीक्षक मुकेश शेंदे्र, मनिष बैरिसाल,प्रफुल पानतवने, देवेंद्र वाघाये, संगणक चालक प्रवीण गडे, सुमित शेंडे यांचा समावेश होता.