प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:10 PM2018-10-03T22:10:29+5:302018-10-03T22:12:22+5:30
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून देवरीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी शहरातील पानठेले व डिस्पोजल बॅग विक्रेते अशा विविध दुकानात धाड टाकून खर्रा पन्नी, डिस्पोजल बॅग, कॅरीबॅग अशा विविध प्रकारचे साहित्य चार दुकानातून जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून देवरीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी शहरातील पानठेले व डिस्पोजल बॅग विक्रेते अशा विविध दुकानात धाड टाकून खर्रा पन्नी, डिस्पोजल बॅग, कॅरीबॅग अशा विविध प्रकारचे साहित्य चार दुकानातून जप्त केले. तसेच २० हजार रुपयाचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. देवरी शहरात पुढील काळात राबविण्यात येत असलेल्या प्लास्टीक बंदीचा संदेश आपल्या या कारवाईतून दिला. या कारवाईमुळे शहरातील इतर प्लास्टिक साहित्य विकणाºया दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. शासनाने प्लास्टिक व थर्माकोल विक्रीवर बंदी लागू केली आहे. मात्र यानंतरही काही विक्रेते प्लास्टिकची सर्रासपणे विक्री करीत आहे. दरम्यान मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी अवैध प्लास्टिक विक्रेत्यांवर तपासणी मोहीम राबवून कारवाई केली. ही कारवाई नगर पंचायतचे पाणी पुरवठा अभियंता सचिन मेश्राम, कर्मचारी कैलास सोनवाने, वामन फुन्ने, अरुण धारगाये यांनी केले.
पथनाट्यातून जनजागृती
देवरी शहरात प्लास्टिक बंदी व केरकचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. याबाबत नागरिकांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगर पंचायत देवरीच्या वतीने संपूर्ण शहरात पंधरा दिवस स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे सांगितले. देवरी शहरात शंभर टक्के कचरा विलगीकरण करण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला. या वेळी नगराध्यक्ष कौशल कुंभरे, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, नियोजन सभापती व बांधकाम सभापती नेमीचंद आंबीलकर, महिला व बाल कल्याण सभापती सीता रंगारी, माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, नगरसेवक प्रवीण दहीकर, संतोष तिवारी, यादोराव पंचमवार, नगरसेविका भूमिता बागडे, कांता भेलावे, माया निर्वाण उपस्थित होते.