गौण खनीज काढणाऱ्या सात जणांवर कारवाई
By Admin | Published: July 6, 2017 02:04 AM2017-07-06T02:04:11+5:302017-07-06T02:04:11+5:30
तालुक्यातील हरदोली साझा क्रमांक ५ मध्ये अवैधरित्या ३४६ ब्रास गिट्टी व बोल्डर काढणाऱ्या सात जणांवर
तहसीलदारांनी ठोठावला ३६ लाखांचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील हरदोली साझा क्रमांक ५ मध्ये अवैधरित्या ३४६ ब्रास गिट्टी व बोल्डर काढणाऱ्या सात जणांवर नवनियुक्त तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनीयम १९६६ च्या ४८/७ नुसार दंडात्मक कारवाई करून ३६ लाख रूपयांचा दंड ठोठावला.
तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी हरदोली साझ्यामध्ये येणाऱ्या ओवारा व हरदोली येथील सात जणांनी शासनाची परवानगी न घेता ३४६ ब्रास गिट्टी व बोल्डर उत्खनन करून संग्रहीत केले होते. यावर हरदोलीच्या तलाठी पी.एम.मेश्राम यांनी कारवाई करीता तहसीलदारांना अहवाल सादर केला होता. त्यावर नवनियुक्त तहसीलदार विजय बोरूडे यांनी बुधवारी (दि.५) आदेश काढून सातही जणांवर दंडात्मक कारवाई केली.
यात विश्वनाथ मंसाराम वलके (रा.ओवारा) यांना १५ ब्रास गिट्टी व बोल्डरकरिता १ लाख ५६ हजार रूपये, तेजराम दशरथ मदनकर (रा.देवाटोला) यांना १५ ब्राससाठी १ लाख ५६ हजार रूपये, मंगल मेश्राम (रा.अेवारा) यांना १०० ब्राससाठी १० लाख ४० हजार रूपये, संतोष मारोती मोटघरे (रा.ओवारा) यांना ५० ब्राससाठी ५ लाख २० हजार रूपये, कैलाश बोरकर (रा.देवाटोला) यांना १०० ब्राससाठी १० लाख ४० हजार रूपये, कारू खरोले (रा.ओवारा) याना ५० ब्राससाठी ५ लाख २० हजार रूपये व रामचंद्र वलके (रा.ओवारा) यांना १६ ब्राससाठी १ लाख ६६ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंडाचे ३६ लाख रूपये शासनाला त्वरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, तहसील कार्यालयाला शासनाकडून २२ लाख रूपयांचे वार्षिक लक्ष्य दिले गेले होते. या कारवाईमुळे सरकारी खजिन्यात ३६ लाख रूपये जमा होणार असल्याने तहसीलदार बोरूडे यांच्या कारवाईचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे. तर दुसरीकडे तहसीलदारांच्या या दबंग कारवाईमुळे अवैधरित्या गौण खनीज काढणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.