निकृष्ट तांदूळ पुरवठाप्रकरणी ३७ राइस मिलर्सवर कारवाई, तीन वर्षांसाठी टाकले काळ्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 02:08 PM2023-08-12T14:08:34+5:302023-08-12T14:08:59+5:30
गुणवत्ता निरीक्षकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न
गोंदिया : निकृष्ट तांदूळ पुरवठाप्रकरणी केंद्रीय तपासणी पथकाच्या अहवालावरून जिल्हाधिकारी चिन्मय काळे यांनी जिल्ह्यातील एकूण ३७ राइस मिलर्सवर कारवाई करीत त्यांना तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले. तसेच रद्द केलेल्या तांदळाऐवजी तेवढाच तांदूळ नव्याने सहा आठवड्यांत जमा करण्याचे आदेश राइस मिलर्सला दिले आहे. राइस मिलर्सनी पण तांदूळ जमा केला तेव्हा तो उत्कृष्ट होता आणि आता निकृष्ट कसा झाला असे म्हणत न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या कारवाईवरून नवा पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने शासकीय धान खरेदी केली जाते. शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या तांदळाची राइस मिलर्ससह करार करुन त्याची भरडाई केली जाते. त्यानंतर राइस मिलर्स तांदळाची भरडाई करून सीएमआर तांदूळ पुरवठा विभागाच्या माध्यमातून एफसीआयकडे जमा करतात. तांदूळ जमा करण्यापूर्वी तांदळाच्या लाॅटची गुणवत्ता निरीक्षकाकडून चाचपणी केले जाते. त्यानंतर तो गोदामात जमा केला जातो. गोदामात जमा केलेला हा तांदूळ कधी दोन महिन्यांत तर कधी वर्षभराच्या कालावधी अन्न पुरवठा विभागाच्या निर्देशाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यासाठी पुरवठा केला जातो.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातून कोल्हापूर, नाशिक, लातूर, नंदूरबार या जिल्ह्यांना पुरवठा करण्यात आला होता. यापैकी काही तांदळाच्या लाटची केंद्रीय पथकाने तपासणी केली असता तो तांदूळ निकृष्ट दर्जाचा व मानवास खाण्या योग्य नसल्याचा ठपका ठेवला. तसेच हा तांदूळ ज्या राइस मिलर्सने जमा केला त्यांना तो परत पाठवून तेवढाच तांदूळ नव्याने जमा करण्यास सांगितले. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ३७ राइस मिलवर कारवाई करीत तीन वर्षांसाठी शासकीय धानाची भरडाई करण्यास मनाई करीत काळ्या यादीत टाकले.
कुठल्या निकषावर पास केला तांदूळ
गुणवत्ता निरीक्षकांनी पास केलेल्या तांदळाचे लॉट केंद्रीय तपासणी पथकाने रद्द केले. शिवाय हा तांदूळ मानवास खाण्यायोग्य नसल्याचा ठपका अहवालात ठेवला. त्यामुळे एवढा निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा केला जात असेल तर गुणवत्ता निरीक्षकांने तो कुठल्या आधारावर गोदामात जमा करण्याची परवानगी दिली यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
२२ हजार क्विंटल तांदळावर प्रश्नचिन्ह
राइस मिलर्सने भरडाई करून जमा केलेल्या २२ हजार क्विंटल तांदळावर केंद्रीय पथकाने ठपका ठेवला आहे. या तांदळाची किंमत ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ४८ दिवसांत तेवढाच तांदूळ राइस मिलर्सला पुन्हा जमा करावा लागणार आहे.
राइस मिलर्सची न्यायालयात धाव
दोन वर्षांपूर्वी आम्ही भरडाई करून जमा केलेला तांदूळ उत्कृष्ट होता. गुणवत्ता निरीक्षकांनी तो पास केला होता. यानंतर दोन वर्षे तो गोदामात पडून होता. गोदामात पाणी गळती व इतर कारणामुळे सुद्धा तांदूळ खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर आम्ही पुरवठा केलेला सरसकट सर्वच तांदूळ खराब नाही इतरांचाही तांदूळ त्यात मिक्स झाला, या गोष्टींचा आधार घेत राइस मिलर्सनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.
या राइस मिल्सवर झाली कारवाई
धर्मा राइस मिल, बटाना, दादीजी इंडस्ट्रीज, सावरी, आशुतोष फुड्स, गणखैरा, जय दुर्गा राइस मिल, गोरेगाव, दादीजी ॲग्रो, गोरेगाव, सिद्धिविनायक राइस मिल, तेढा तुमसर, गुप्ता राइस इंड., तुमखेडा, दादी माँ राइस मिल, गणखैरा, जयदुर्गा राइस मिल, शहारवानी, माँ गायत्री ॲग्रो इंड.,डव्वा, रामदेव ॲग्रो प्रोड्क्ट, अर्जुनी मोरगाव, संजय राइस मिल, अर्जुनी मोरगाव, ईश्वर राइस मिल, महागाव, शारदा राइस मिल, अर्जुनी मोरगाव, रामदेव बाबा राइस मिल, कनेरी, बालाजी राइस मिल, नवेगावबांध, सहकार राइस मिल, कवलेवाडा, तिरुपती राइस मिल, गणखैरा, राहुल ॲग्रो प्रोसेसर, प्रेमश्री राइस मिल, कुऱ्हाडी, राजेश राइस मिल, गणखैरा, गुरुकृपा पॅडी प्रोसेसर, डव्वा, कोमल राइस मिल, गोंदिया, गजानन राइस ॲन्ड पोहा मिल, गोंदिया, गुरुतेज बहादूर राइस मिल, रतनारा, चिलारे बंधू राइस मिल, सरांडी, ज्योती राइस मिल, सरांडी, डी. जी. स्टीम, सुखदेवटोली, तिरुपती साॅरटेक्स, गोंदिया, पराग राइस मिल, गोंदिया, पार्थ एग्रो व्हिजन, गोंदिया, प्रल्हाद राइस मिल, गोंदिया, गणेश राइस मिल, सावरी, सहयोग राइस मिल, पांढराबोडी, अन्नपूर्णा ॲग्रो इंडस्ट्रीज, खातिया, साईबाबा राइस मिल, गांधी राइस मिल, न्यू शक्ती राइस मिल, चिंतामणी राइस मिल, गजानन राइस मिल, फुलचंद राइस मिल, गोंदिया आदींचा समावेश आहे.