‘त्या’ आरोपींवरील कारवाई थंडबस्त्यात
By admin | Published: February 2, 2017 01:06 AM2017-02-02T01:06:28+5:302017-02-02T01:06:28+5:30
कोसमतोंडी परिसरातील ग्राम मुरपार, लेडेझरी परिसरातील २ ते १४ डिसेंबर दरम्यान
सागवान कटाई : चौकशीची मागणी
पांढरी : कोसमतोंडी परिसरातील ग्राम मुरपार, लेडेझरी परिसरातील २ ते १४ डिसेंबर दरम्यान आदिवासींची ३२ सागवन झाडे व गैरआदिवासींची ३१ झाडे कंत्राटदाराने कोसमतोंडी परिसरातील वनपाल, वनमजूर व वनरक्षक यांच्या संगनमताने कापले. या प्रकरणात सहभागी वनरक्षकाला निलंबित करण्यात आले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाई थंडबस्त्यात आहे.
कापलेल्या सागवन झाडाचे आदिवासी गटाचे प्रकरण तयार न करता कंत्राटदारासोबत संगनमत करून विक्री करण्याचा कट फसला. गोंदिया येथील उपवन संरक्षण डॉ. रामगावकर यांनी मुरपार, लेडेझरी येथील वनरक्षकाला तत्काळ निलंबित केले व चौकशीसाठी नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक सोपविण्यात आले.
आठ ते दहा दिवसांचा कालावधी आटोपूनसुध्दा वनपाल जे.जी. खोब्ररागडे, वनमजूर उध्दव गायकवाड व अन्य वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. लाखो रुपयांचे सागवन आदिवासी व गैरआदिवासी यांच्या गटातील कापल्याची तक्रार होताच अधिकारी वर्गाने हातोडा लावून डेपो डोंगरगावला हलविण्यात आला. तर काही माल मुरपार येथे ठेवण्यात आलेला आहे.
या परिसरामध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कित्येक दिवसांपासून असा गोरखधंदा चालू असल्याचे गावामध्ये बोलले जात आहे. त्यामुळे कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील दोषींना निलंबित करून या परिसरामध्ये नवीन वनपाल, वनमजूर व वनरक्षक द्यावे, अशी मागणी केली जात आहे.(वार्ताहर)