परवानगी शिवाय ड्रोनने 'प्री-वेडिंग' शूटिंग कराल तर होईल कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:38 IST2024-11-13T15:35:51+5:302024-11-13T15:38:56+5:30
एकावरही कारवाई नाही: अपघात टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक

Action will be taken if you do 'pre-wedding' shooting with drones without permission
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण, परंतु लग्नापूर्वीच प्री-वेडिंग करून लग्नात नवरा-नवरीचे शूटिंग दाखविले जाते. लग्नापूर्वीपासून, तर लग्नापर्यंत फोटो शूटिंग, व्हिडीओ शूटिंग व ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करण्याचे जणू फॅडच लागले आहे. लग्नात ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. मात्र, येथे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय ड्रोनचा वापर होत असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.
लग्न समारंभाची शूटिंग आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करायची असेल, तर आधी पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणारी शूटिंग कधी व किती उंचीवरून करणार आहेत, याची इत्यंभूत माहिती पोलिस ठाण्यात द्यावी लागते. विमान व हेलिकॉप्टर यांच्या मार्गावर ड्रोन असेल, तर त्या ड्रोनपासून धोका होण्याची दाट शक्यता असते. हा अपघात टाळण्यासाठी पोलिस व विमान प्राधिकरणाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ड्रोनच्या साहाय्याने शूटिंग करण्याचे फॅड लागल्याने प्री- वेडिंगसाठी लोक जुने स्मारक, किल्ले, पहाड, धरण व पुरातत्त्व विभागाने बंदी केलेल्या ठिकाणीही जाऊन शूटिंग करताना दिसत आहेत. हे शूटिंग करताना अनेकदा अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी ड्रोन चालविणारा तज्ज्ञ असावा व यासाठी पोलिस ठाण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे, परंतु परवानगी न घेताच ड्रोनचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही.
ड्रोन वापरण्यासाठी नियम
विमानतळ असेल अशा ठिकाणी उंचीवरून ड्रोन उडवू नये, अन्यथा विमानाला टक्कर होऊन अपघात होऊ शकतो. शासनाने २५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे ड्रोन असावेत, असे नियम काढले आहे. त्या नियमात राहूनच ड्रोनचा वापर करता येईल. ड्रोन चालविताना ज्या रस्त्यावरून फिरविला जात आहे. त्या दोन्ही बाजूंच्या घरांतील लोकांची ड्रोनकरिता परवानगी घेणे आवश्यक आहे.
ड्रोन वापरण्यासाठी लायसन्स हवे
ड्रोनद्वारे शूटिंग करण्यासाठी शूटिंग करणाऱ्याजवळ परवाना असणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी ड्रोन उडविता येत नाही.
३० हजार रुपये खर्च येतो एका शूटिंगचा
- ड्रोनचा वापर प्री-वेडिंग किंवा लग्नात करायचा असेल, तर पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतल्यास कारवाई होऊ शकते.
- ड्रोनद्वारे करण्यात आलेले शूटिंग, एडिटिंग व चित्रफीत तयार करण्यासाठी ३० हजारांच्या घरात खर्च येतो.
- प्री-वेडिंगपासून लग्नसमारंभ आटोपेपर्यंत सर्वांची ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येते. ड्रोनचे आकर्षण आता लोकांमध्ये आहे. जुने स्मारक, किल्ले, पहाड, धरण व पुरातत्त्व विभागाने बंदी केलेल्या ठिकाणी ड्रोन वापरायचे असेल, तर संबंधित विभागाची परवानगी घ्यावी.
- ड्रोन चालविणारा व्यक्ती अनुभवी व प्रशिक्षित असावा जेणेकरून अपघात घडणार नाहीत.
- बस स्थानक, रेल्वे स्थानक व विमानतळावर परवानगीशिवाय ड्रोनने शूटिंग करता येणार नाही.