सिलिकॉन मॅग्नीजची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय
By admin | Published: May 23, 2017 12:53 AM2017-05-23T00:53:31+5:302017-05-23T00:53:31+5:30
सिलिकॉन मॅग्नीजची वाहतूक करतांना बाराभाटी येथील ठरलेल्या ठिकाणी मॅग्नीज मध्ये भेसळ करायची.
असंतुष्ट मजुराने केला भंडाफोड : मार्च महिन्यापासून सुरु होता गोरखधंदा
संतोष बुकावन । लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : सिलिकॉन मॅग्नीजची वाहतूक करतांना बाराभाटी येथील ठरलेल्या ठिकाणी मॅग्नीज मध्ये भेसळ करायची. खरे मॅग्नीज काढून इतरत्र मोठ्या किंमतीत विक्री करणारी टोळी पोलिसांनी पकडली. हे मोठे रॅकेट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र याचा खरा सूत्रधार कोण? व चोरी केलेला माल कुठे विकला जात होता हे रहस्य अद्याप उलगडले नाही. दोन आरोपींना अटक झाली असली तरी अद्याप तीन आरोपी फरार आहेत.
शनिवारी पहाटे २ च्या सुमारास पोलिसांनी मॅग्नीज चोरी पकडली. हा गोरखधंदा मार्च महिन्यापासून सुरु होता, असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. चंद्रपूरच्या फेरोमाईन्स अलायंसमधून ओरिसा राज्याच्या सुंदरगड जिल्ह्यातील राहुलकेला येथे सिलिकॉन मॅग्नीजची नेहमीच वाहतूक व्हायची. या ट्रकमधील अर्धे असली मॅग्नीज काढून त्यात दगडाची चूरी भरण्याचा कट चोरट्यांनी रचला. यासाठी बाराभाटी परिसरातील एक राईल मिल ५० हजार रुपये महिन्याकाठी भाड्याने घेण्यात आली. याठिकाणी वजनकाटा, बॅग पॅकींग करण्याची मशीन, चूरी असे साहित्य असायचे.
सिलिकॉन मॅग्नीज भरून चंद्रपूर येथून निघालेले ट्रक बाराभाटी येथे पोहोचण्याच्या पूर्वीच २५ किलो दगडी चूरी भरलेल्या बॅग तयार ठेवल्या जात असत. ट्रक बाराभाटी येथे पोहोचताच ट्रकमधील २५ किलो असली सिलिकॉन मॅग्नीज काढायचे व त्यात २५ किलो दगडी चुरी भरली जात होती. या बॅगला चंद्रपूर येथील कंपनीद्वारे मजबूत शिलाई, मार्कीग कंपनीचे सिल, स्टिकर लावले असायचे.
यावर झाकलेल्या ताडपत्रीला देखील सिल असायचे. मात्र ही टोळी पध्दतशिरपणे सिल काढून बॅगमध्ये अदलाबदल करायचे. दगडी चूरीला सिल्व्हर रंग मारून त्याला राईस मिलमध्ये उन्हात ट्रक येण्याच्या दोन दिवसापूर्वीच वाळवले जात होते. दगडी चूरी सुध्दा हुबेहूब सिलिकॉन मॅग्नीज सारखी दिसावी हा यामागचा हेतू होता.
यासाठी बाराभाटी येथील मजूरांकडून ही कामे करवून घेतली जात होती. आपल्या गावात असे कृत्य होत असल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागली होती. काही जागरुक लोक या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याच्या मागावरच होते.
घटना उघडकीस येण्याच्या ४ दिवसापूर्वी राईल मिल हे स्थळ बदलण्याचे ठरविण्यात आले होते. विशेष म्हणजे हे ट्रक बाराभाटी येथे रात्री १२ ते १ वाजता दरम्यान पोहोचतील व त्यावेळी ही सरमिसळ करण्याची दक्षता हे चोरटे घेत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
घटनेच्या दिवशी मॅग्नीजची सरमिसळ करण्याचे स्थळ बदलण्यात आले. स्थानिक मजूरांचा वापर होत होता. यापैकीच असंतुष्ट मजूराने हा भंडाफोड केल्याच्या चर्चा आहे. या प्रकरणाची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांना देण्यात आली. पोलिसांनी नियोजनबध्द पद्धतीने सापळा रचला.
शनिवारी रात्री २ वाजताचे दरम्यान बाराभाटी येथे सिलीकॉन मॅग्नीजचे दोन ट्रक पकडले. यात रानतो राऊरकेला येथील लक्ष्मण माधू एक्का (३०) व दिलीपकुमार खाडा लकडीया (३३) राऊरकेला या आरोपींना पकडण्यात आले. अरविंदसिंग, हरविंदर कौर व टकल्या हे तीन आरोपी फरार आहेत.
मुख्य सूत्रधार कोण?
सिलीकॉन मॅनीजची चोरी गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात सुरु आहे. या मागे कुणीतरी मोठ्या एखाद्या स्थानिक व्यक्तीचा हात असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. राईस मिल भाड्याने कुणी घेतली होती. तोच व्यक्ती या गोरखधंद्याचा खरा सूत्रधार असावा. राईस मिल चालकाकडून त्याचा उलगडा होऊ शकतो. हा मॅग्नीज राऊरकेला येथील कंपनीत जात होता. बॅग व ताडपत्रीची मूळ पॅकींग काढलेली असायची. हा माल स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब का आली नाही. तेथील कर्मचाऱ्यांचाही कटात सहभाग तर नाही ना? सरमिसळ केल्यानंतर उरलेल्या असली सिलीकॉन मॅग्नीजची विक्री ही टोळी कुठे करत होती? याचा उलगडा होणे आवश्यक आहे.