कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली लगीनघाई, गावागावात भेटीगाठी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:58+5:302021-06-26T04:20:58+5:30
केशोरी : कोरोना विषाणू महामारीचा प्रभाव कमी होत आहे. त्याचबरोबर जुलै २०२० ला मुदत संपलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत ...
केशोरी : कोरोना विषाणू महामारीचा प्रभाव कमी होत आहे. त्याचबरोबर जुलै २०२० ला मुदत संपलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीचे डोहाळे लागले असून, आपणच उमेदवार असू अशा आविर्भावात गुडघ्याला बाशिंग बांधून कार्यकर्त्यांच्या या परिसरातील गावागावात भेटीगाठी वाढल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग येत्या काही दिवसांमध्ये प्रभागनिहाय आरक्षण खुले करण्याची दाट शक्यता आहे. जाहीर होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीकडे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आरक्षण कोणत्या पद्धतीच्या निकषावर काढण्यात येते याची कोणत्याही कार्यकर्त्यांना जाणीव नसताना आपल्याच वैयक्तिक मताप्रमाणे आरक्षणाची निश्चितता काढीत आहेत. सर्वच राजकीय पक्षांचा स्वबळाचा विचार असल्यामुळे त्या पद्धतीने कार्यकर्ते वावरताना दिसून येत आहेत. केशोरी आणि गोठणगाव या दोन जिल्हा परिषद क्षेत्रांत दोन-दोन पंचायत समिती क्षेत्र अंतर्गत असून या क्षेत्रात सर्वच राजकीय पक्षांतील वरिष्ठांनी आढावा बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार कार्यकर्त्यांनी सुद्धा गावागावात जाऊन आपले संघटन मजबूत करण्याच्या भानगडीत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांना फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे.
...........
काेणते क्षेत्र राखीव होणार
होऊ घातलेल्या जि.प., पं.स. निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा टक्का कमी झाल्याने निवडणूक लढविण्यासाठी स्वयंघोषित इच्छुक उमेदवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. आता आरक्षणामुळे निश्चित बदल होईल, त्या दृष्टीने पक्ष कार्यकर्त्यांनी हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकाला आपल्या क्षेत्राचे आरक्षण आपल्यासाठी अनुकूल असेल, असे वाटत आहे. केशोरी आणि गोठणगाव या दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रांत सर्व राजकीय पक्षांचे समांतर प्राबल्य आहे. त्यामुळे त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते आपणच उमेदवार राहू, असे दर्शवित आहेत. आरक्षणासंदर्भात मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा चर्चा रंगताना दिसून येत आहे.