निवडणूक निकालाचे तीव्र पडसाद
By admin | Published: January 11, 2017 01:54 AM2017-01-11T01:54:18+5:302017-01-11T01:54:18+5:30
गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गोंदियात विविध ठिकाणी उमटले.
गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गोंदियात विविध ठिकाणी उमटले. सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या विजयी मिरवणुकीवर पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाली. त्यातच नंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आल्याने मंगळवारीही तणावसदृश परिस्थिती होती. दुसऱ्या एका मिरवणुकीदरम्यान रामनगरातील एका विजयी मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाला. तर तिसऱ्या घटनेत भाजपाच्या पराभूत उमेदवाराच्या पतीकडून भाजपच्याच पदाधिकाऱ्याला मारहाण झाली.
पोलीस सूत्रानुसार, प्रभाग क्रमांक १८ मधून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय रगडे यांनी नागरिकांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी रात्री गौतम नगराच्या मदिना मस्जिदच्या मागील रस्त्याने विजयी मिरवणूक काढली. यादरम्यान त्यांच्या मिरवणुकीवर काँग्रेसच्या पराभूत उमेदवारासह काही लोकांनी दगडफेक केल्याने त्या २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रगडे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केल्यामुळे त्यांच्या ६६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या दगडफेकीत नगरसेवक विजय रगडे, त्यांचे भाऊ रंजीत गणेश रगडे (४२) रा.सावराटोली व इतर कार्यकर्ते जखमी झाले. रगडे यांनी काँग्रेसचे उमेदवार अफजल हुसैन शाह ऊर्फ छन्नुभाई यांचा पराभव केल्यामुळे या पराभवाचे शल्य पचवू न शकलेल्या छन्नुभाई व त्यांच्या कार्यकत्यांनी त्यांच्या विजयी रॅलीवर विटा, दगड, भांडी फेकून मारहाण केली. इतकेच नव्हे तर तलवारीही काढण्यात आल्या. रगडे यांना जातीवाचक शिवीगाळही केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर गोंदिया शहरात तणाव निर्माण झाला होता.
मिरवणूक रॅलीवर हल्ला करणाऱ्या आरोपी अफजल छन्नू शाह, आसिफ कानखो, संदीप जेबकट, सलीम कुरैशी, शब्बीर पठान, शब्बीर पठानचा मुलगा, शब्बीर पठानची पत्नी, अफजल शाहचा मोठा मुलगा, आरिफ कुरैशी, रफिक तोत्या व इतर १० इसम अश्या २० जणांवर गोंदिया शहर पोलिसांनी रंजीत गणेश रगडे (४२) यांच्या तक्रारीवरुन भादंविच्या कलम १४१, १४७, १४९, २९४, ३२४, ३४१, सहलकम ३, १, आर.एस.३,२, व्ही.ए. अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७, १, ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(तालुका प्रतिनिधी)
रामनगरातही मिरवणुकीत तणाव
रामनगर येथील जुन्या विद्युत पॉवर हाऊस जवळून विजय मिरवणूक जात असताना अश्विन हनुवंतराव नायडू (३२) याचा खांदा कृणाल पारधी याला लागला. यावरून झालेल्या वादात नऊ जणांवर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अश्विन नायडू यांना आरोपी कृणाल पारधी, राजू पारधी, अशोक पारधी, चिनू पारधी, सुमीश पारधी व इतर चार अशा नऊ जणांनी बेदम मारहाण केली. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी सदर आरोपीविरूध्द भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेवक रगडेंवर गुन्हा दाखल
नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधून विजयी झाल्यानंतर विजय गणपत रगडे या नगरसेवकाने ८० ते १०० कार्यकर्त्यांना घेऊन विजयी रॅली काढली. परवानगी न घेताच रॅली काढल्यामुळे गोंदिया शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
६६ लोकांवर गुन्हा दाखल
विजय रगडे यांच्या विजयी मिरवणुकीवर दगडफेक केल्यानंतर रगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यासमोर येऊन घोषणाबाजी करीत आक्रोश व्यक्त केला. रस्ता अडवून ठेवून पोलिसांच्या कामात अडथडा निर्माण केला. रात्री ९ वाजतापर्यंत हा रस्ता अडून होता. या संदर्भात पोलिस हवालदार हालीकचंद चौधरी यांच्या तक्रारीवरुन मोहीत रगडे, सहस होलीकर, अंकुश मेश्राम, हरिष टेंभेकर, अमीत बोरकर, संतोष जांभुळकर व इतर ६० महिला-पुरुषांनी रस्ता अडवून ठेवल्यामुळे त्यांच्यावर भादंविच्या कलम १४३, १५१, १५३, अ, ३४१, १८६ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या २० लोकांवर गुन्हा दाखल
प्रभाग क्रमांक १८ येथून निवडणूक जिंकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय रगडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकली, असा आरोप करणारे काँग्रेसचे पराभूत उमेदवार अफजल छन्नू शाह यांनी मुस्लीमांना भडकावून धर्म आणि जातीच्या नावावर तेढ निर्माण केला, अशी तक्रार निवडणूक बंदोबस्तासाठी गोरेगाव पो.ठाण्यातून आलेले सहायक पो.निरीक्षक मनिष बन्सोड यांनी शहर पोलिसात केली. त्यावरून अफजल छन्नू शाह याच्यासह इतर २० जणांवर भादंविच्या कलम १४३, १५१, १५३, अ, ३४१, १८६ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.