रोहयो कामाचे पैसे जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:36 PM2018-03-17T23:36:51+5:302018-03-17T23:36:51+5:30
आजूबाजूच्या अनेक गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. काही खेड्यांत पाट (लहान कालवा), मुंडा जलाशय, बोडी तलाव आणि रस्त्यांची कामे करणे सुरु आहेत.
ऑनलाईन लोकमत
बाराभाटी : आजूबाजूच्या अनेक गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. काही खेड्यांत पाट (लहान कालवा), मुंडा जलाशय, बोडी तलाव आणि रस्त्यांची कामे करणे सुरु आहेत. पण कामावर गेलेल्या मजुरांची मजूरी लवकर जमाच होत नाही. म्हणून कामाचे पैसे तत्काळ जमा करण्याचीे मागणी मजुरांकडून केली जात आहे.
तालुक्यात सुमारे ८० टक्के गावांत रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली. काम बरोबर होतात की नाही, याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष नाही, असे मजूर सांगतात. काही गावात १८ वर्षाखालील मजूर कामावर घेतले जातात. तर काही गावांमध्ये वयाचे ६० पूर्ण झालेले सुद्धा मजूर असतात. हा प्रकार ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या मनरेगाच्या कामावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक गावातील मजूर हे कामावर दांडी मारत असले तरिही हजेरी लावली जाते. कष्टाळू मजूर हे काम खूप मेहनतीने करत असतात पण मेहनतीप्रमाणे मजूरी मिळत नाही.
आठवडाभर काम करुन सुद्धा मजुरांचे पैसे बरोबर जमा होत नाही. परिणामी मजुरांना विनाकारण चकरा माराव्या लागत असल्याने मजूर त्रस्त झाले आहे.
प्रस्थापित शासन हे सर्वसामान्य हिताचे काम करत नाही. मजुरांना, सामान्य माणसांना विनाकारण त्रास देतात, अनेक वेळा मजुरांना सिंगल व संयुक्त खाते उघडण्यास सांगतात. पण काम मात्र संबंधीत विभाग व बँकेकडून होत नाही. आधार लिंक, भ्रमणध्वनी लिंक असे नानाविध कारणे सांगून मजुरांना त्रास दिला जात आहे. दिवसभर काबाळकष्ट करून घामाचे पैसे मिळत नसल्याने मजुरांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे.
लोकप्रतिनिधीनी यासर्व प्रकाराची नोंद घेवून मजुरांचे थकीत मजुरी मिळवून द्यावी. अशी मागणी अशी मागणी येरंडी, बोळदे, कवठा, सुकळी, बाराभाटी, कुंभीटोला, डोंगरगाव, ब्राम्हणटोला, सूरगाव, देवलगाव येथे कामे सुरु असलेल्या गावांतील मजुरांची आहे.