आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:27 AM2021-04-12T04:27:06+5:302021-04-12T04:27:06+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली असून, बाधितांची वाढती संख्या बघता जिल्ह्यात आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविण्यात ...
गोंदिया : जिल्ह्यातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली असून, बाधितांची वाढती संख्या बघता जिल्ह्यात आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारपर्यंत जिल्ह्यात ३४ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वाढविण्यात आलेल्या ११ मध्ये आठ कंटेन्मेंट झोन सडक-अर्जुनी येथील आहेत.
जिल्ह्यातील बाधितांची संख्या रविवारी ७४५वर गेली आहे. यामुळे क्रियाशील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात असून, त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे अन्य लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यापासून इतरांना धोका उद्भवू नये, यासाठी आता कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्यात एकूण २० कंटेन्मेंट झोन होते. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यात आता वाढ करून शनिवारी (दि. १०) आणखी तीन कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले होते.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याचे सत्र सुरूच असल्याने रविवारी आणखी ११ कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आता जिल्ह्यात एकूण ३४ कंटेन्मेंट झोन झाले आहेत, तर वाढविण्यात आलेल्या ११ कंटेन्मेंट झोनमध्ये १ अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम जान्हवा, १ गोंदिया शहरातील मनोहरभाई वॉर्ड कालीबाडी, तर १ फुलचूरपेठ येथील असून, उर्वरित ८ सडक-अर्जुनी येथील आहेत.
----
सडक-अर्जुनीत कोरोनाचा कहर
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम माहुली येथे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, तेथे ३२ बाधित आहेत. तसेच कोहळीटोला येथेही कंटेन्मेंट झोन असून, तेथे २० बाधित आहेत. अशात आता सडक-अर्जुनीत आणखी आठ कंटेन्मेंट झोन तयार करावे लागले आहेत. यात वॉर्ड क्रमांक १, २, ३, ६, ७, ८, १६, १७ यांचा समावेश आहे. येथे ३२ कोरोनाबाधित आहेत.
-----
आता झाले एकूण ३४ कंटेन्मेंट झोन
शुक्रवारच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २० कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक आठ कंटेन्मेंट झोन गोंदिया शहरातील होते. मात्र, कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला असून, बाधितांमध्ये दिवसेंदिवस भर घालत असल्याने आता कंटेन्मेंट झोनमध्येही वाढ करावी लागत आहे. यामुळेच शनिवारी तीन कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले, तर रविवारी ११ कंटेन्मेंट झोनची भर पडली आहे.