व्यसनाधीन कर्मचाऱ्याचा आरोग्य केंद्रात गोंधळ; गंगाझरी पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 04:46 PM2023-01-16T16:46:55+5:302023-01-16T16:49:17+5:30
कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
गोरेगाव (गोंदिया) : तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत केंद्रात गोंधळ घातला. एवढेच नव्हे तर त्याला हटकणाऱ्या आरोग्य सेविकेला शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे गावकऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता तो नशेत असल्याचे दिसून आले. या प्रकरणाने कवलेवाडा गावात एकच खळबळ उडाली असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांत आरोपी राहुल गोस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व्यसनमुक्त राहण्याचा संदेश देणाऱ्या आरोग्य केंद्रातील कर्मचारीच व्यसनाधीन असले, तर व्यसनमुक्त समाजाची कल्पना कशी करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कवलेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत राहुल गोस्वामी हा शुक्रवारी (दि.१३) रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ करीत होता. दरम्यान, कार्यरत आरोग्य सेविकेने त्याला हटकले असता त्याने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर शनिवारी (दि.१४) सकाळी पुन्हा राहुल गोस्वामी याने नशेत गोंधळ घालणे सुरू केले. यावर आरोग्य सेविकेच्या पतीने त्याला हटकले असता आरोपीने धक्काबुक्की केली. दरम्यान, गोंधळ वाढत गेल्याने गावकरीही प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा झाले. या घटनेची माहिती गंगाझरी पोलिसांना देण्यात आली असून, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी राहुल गोस्वामी याला ताब्यात घेतले आहे. फिर्यादी वैद्यकीय अधिकारी आलोक शुक्ला यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलम ८५(१) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राहुल गोस्वामी हे प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा येथे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. १३ व १४ तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या प्रकरणाची माहिती वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येईल.
- डाॅ. विनोद चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, गोरेगाव