कट्ट्यामागे ५ किलो धान अतिरिक्त घेतले जातेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:40+5:302021-06-23T04:19:40+5:30
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील शासकीय धान खरेदी केद्रांवर रबी धान खरेदी कासव गतीने सुरू असून, शेतकऱ्यांच्या मालाऐवजी व्यापाऱ्यांचा माल ...
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील शासकीय धान खरेदी केद्रांवर रबी धान खरेदी कासव गतीने सुरू असून, शेतकऱ्यांच्या मालाऐवजी व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. त्यात शेतकऱ्यांकडून एका कट्ट्यामागे पाच किलो धान अधिक घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल आणि लूट केली जात आहे.
शासकीय पत्रकानुसार ४०. ६०० किलो धान घेणे बंधनकारक असून, शेतकऱ्यांकडून ४२.६०० किलो धान घेतले जाते. तसेच प्रतिबॅगमागे ५ किलोप्रमाणे १०० रुपयांचे धान व काटा, पलटी, उतराईच्या नावावर २० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे ४० रुपये असा एकूण १४० रुपयांचा शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला असता आपले धान घरी परत न्या, अशी वागणूक ग्रेडर करून दिली जाते. त्यामुळे शासकीय धान्य आधारभूत केंद्र शेतकऱ्यांसाठी की संस्थाचालक व व्यापाऱ्यांसाठी आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सर्व धान खरेदी केंद्र नेते, काही पक्षांचे कार्यकर्ते, हितग्राही, संबंधित, नातेवाइकांचे आहेत. तालुक्यातील बहुतेक धान केंद्रांवर अधिकचे धान घेतले जात असून, संबंधित विभागाने याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.