भविष्य निर्वाह निधीचे समायोजन करणे भोवले
By admin | Published: March 2, 2016 02:16 AM2016-03-02T02:16:05+5:302016-03-02T02:16:05+5:30
शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या नावे जमा झालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या मंजुरीविनाच ...
ग्राहक मंचचा निर्णय : नुकसान भरपाईसह रक्कम देण्याचे आदेश
गोंदिया : शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या नावे जमा झालेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या मंजुरीविनाच त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या रकमेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने समायोजित केली. मात्र कायद्याने त्यांच्या मंजुरीविना सदर रक्कम समायोजित करता येत नसल्याचा निर्णय देत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने सदर बँकेला चांगलाच झटका दिला.
नाना चौक, कुंभारेनगर, गोंदिया येथील रहिवासी नवानंद दादू भौतिक हे रेलटोली येथील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत खातेदार सभासद होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना अनुज्ञेय असलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन लाख नऊ हजार रूपये शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर बँकेत त्यांच्या खात्यात वर्ग केली. मात्र तक्रारदाराने बँकेतून घेतलेल्या थकीत कर्जाच्या रकमेत भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर समायोजन केले. त्यामुळे तक्रारदार नवानंद भौतिक यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले.
या प्रकारासाठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जबाबदार असून तक्रारदार भौतिक यांच्या कुटुंबीयांनाही मोठीच आर्थिक तंगी सहन करावी लागली.
भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर समायोजन करता येत नाही, याकरिता त्यांनी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांनी दाखल केलेले पुरावे व युक्तिवाद ऐकण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, भविष्य निर्वाह निधीची रक्कम खातेदाराच्या परवानगीशिवाय कर्जाच्या रकमेत परस्पर समायोजित करता येत नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तक्रारदार भौतिक यांना तक्रार रक्कम दोन लाख नऊ हजार रूपये तक्रार दाखल झाल्याच्या दिनांकापासून नऊ टक्के व्याजाने परत करावी. तसेच मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रूपये द्यावे, असा आदेश पारित केला.
सदर आदेश जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी पारित केले.(प्रतिनिधी)