दोन तृतीयांश बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:45 PM2019-11-30T23:45:09+5:302019-11-30T23:47:13+5:30

एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते.

Adjustment for two-thirds majority begins | दोन तृतीयांश बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू

दोन तृतीयांश बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । जि.प.तील अभद्र युती, मंत्रिमंडळ गठित झाल्यानंतर निर्णय, अभद्र युती तोडण्यासाठी काँग्रेस नेते अनुकुल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रातील राजकारणात तयार झालेल्या नवीन सत्ता समीकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच गोंदिया जि.प.मध्ये मागील साडेचार वर्षांपासून असलेली काँग्रेस-भाजपची अभद्र युती तोडण्यासाठी आता पावले उचलली जात आहे. जि.प.तील विद्यमान सत्ताधाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असून त्यासाठी आता जुळवाजुळव करण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती आहे.
एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र स्थानिक राजकारण आणि दोन्ही पक्षातील नेत्यांच्या मतभेदामुळे काँग्रेसने भाजपसोबत अभद्र युती करुन साडेचार वर्षांपूर्वी जि.प.मध्ये स्थापन केली होती. यामुळे सर्वाधिक सदस्य निवडून येऊन सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी.आ.गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत जि.प., पं.स.सदस्य आणि नगरसेवकांनी सुध्दा भाजपमध्ये प्रवेश केला.
जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसोबत जाण्यासाठी जे नेते अनुकुल होते तेच आता पक्षात नसल्याने जि.प.तील अभद्र युती तोडण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी सक्रीय झाले आहे. त्यामुळेच त्यांनी दोन दिवसांपूर्वी जि.प. तील काँग्रेसचा गट नेता बदलून त्यासंबंधिचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद नियमानुसार सत्तारुढ पदाधिकाऱ्यांवर अविश्वास आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते.यासाठी एकूण ३६ सदस्यांची संख्या असणे आवश्यक आहे. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आणि काँग्रेसच्या एकूण १६ सदस्यांपैकी ११ सदस्य असून ५ सदस्यांना पक्षांतून निलबिंत करण्यात आले होते. त्यामुळे ३६ चा आकडा जुळत नाही.
हीच अडचण ओळखून विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाने निलबिंत केलेल्या ५ जि.प.सदस्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा पक्षात घेतल्यास अविश्वास आणण्यासाठी आवश्यक असलेला ३६ चा आकडा सहजपणे पार करणे शक्य आहे. याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाºयांनी यासंबंधिचे पत्र पक्ष श्रेष्ठींकडे पाठविले आहे. त्यावर निर्णय होताच जि.प.तील अभद्र युती तोडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे.

सदस्य परत येण्यास तयार
विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक जि.प.,पं.स. सदस्य भाजपमध्ये गेले होते.मात्र यापैकी बरेच जण आता काँग्रेसमध्ये येण्यास तयार असून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी सुध्दा अनुकुल असल्याची माहिती आहे.
भाजप बिनधास्त
जिल्हा परिषदेत भाजपसोबत असलेली अभद्र युती तोडण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने हालचाली सुरू केल्या आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भाजप नेते बिनधास्त असून युती तोडण्यासंदर्भात कुठल्याच घडामोडी सुरू नसल्याचे या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. त्यामुळे भाजप बिनधास्त असल्याचे चित्र आहे.

Web Title: Adjustment for two-thirds majority begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.