कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:12+5:30
राज्यातील सर्वच भागात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नव्हता. पण यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात होत्या.तर नागरिक सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत होते. जिल्ह्यात परेदशातून १२९ नागरिक आले व या नागरिकांच्या संपर्कात ६४२ नागरिक आले होते. परदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण गोंदिया शहरात आढळल्यानंतर जिल्हावासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सुध्दा अॅक्शन मोडवर आला आहे.
राज्यातील सर्वच भागात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नव्हता. पण यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात होत्या.तर नागरिक सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत होते. जिल्ह्यात परेदशातून १२९ नागरिक आले व या नागरिकांच्या संपर्कात ६४२ नागरिक आले होते. परदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आली होती. त्यात एकालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळले नाही. तर पाच संशयीतांचे नमुणे कोरोना निगेटीव्ह आढळून आले. त्यामुळे प्रशासन थोड बिनधास्त होते. मात्र दहा दिवसांपूर्वी बँकांकहून गोंदिया येथे परतलेल्या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे शुक्रवारी (दि.२७) प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सदर कोरोना बाधीत युवक हा दहा दिवसांपूर्वीच गोंदिया आला असून या कालावधीत तो अनेकांच्या संपर्कात आला.
दोन दिवसांपूर्वीच त्यांने आपल्या मित्रांसह क्रिकेट सुध्दा खेळले. तर शहरातील एका कॉलनीत तो सर्वाधिक वेळ घालवित होता. शुक्रवारी त्याचा वैद्यकीय अहवाल कोरोना पाझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या चमूने सदर युवकाच्या कुटुंबीयांना सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन घेतले आहे.
सदर कोरोना बाधीत रुग्णांवर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षातच उपचार करण्यात येणार आहे. यासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा येथे उपलब्ध असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
शहरातील एका २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यानंतर तो दहा दिवसांच्या कालावधी तो नेमका कुणा कुणाच्या संपर्कात आला याची माहिती आरोग्य आणि पोलीस विभागाचे अधिकारी शुक्रवारी घेत होते. संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना सुध्दा क्वारेंटाईन करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासणी मोहीम राबविणार
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, त्याला वेळीच प्रतिबंध लागवा यासाठी आरोग्य विभाग आणि नगर परिषदेच्या वतीने शहरात होम टू होम जाऊन आरोग्य तपासणी व माहिती घेण्यात येणार आहे.
युवकांने माहिती लपविल्याने समस्या
गोंदिया येथील हा युवक राजनांदगाव येथील ज्या युवकांसोबत बँकांक ला गेला होता. त्यापैकी दोन मित्रांना कोरोनाची लागण झाली असल्याचे तीन चार दिवसांपूर्वी कळेल. यानंतर या युवकाने सुध्दा स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळेच आरोग्य विभागाच्या चमूने त्याच्या घरी जावून त्याला मेडिकलमध्ये बुधवारी रात्रीच दाखल करुन घेतले.
नागरिकांनी घाबरु नये
गोंदिया येथे कोरोना बाधीत एक रुग्ण आढळल्यानंतर शहर आणि जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सदर बाधीत रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून घाबरण्याचे कसलेही कारण आहे. मात्र नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांनी दिला आहे.
नागरिकांनो घरातच राहा
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. तर रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करुन घराबाहेर पडणे टाळावे.नागरिकांनी घरातच राहून आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन लोकमतने केले आहे.