पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:38+5:302021-04-17T04:28:38+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे आकडे सातत्याने वाढत आहे. अशात आरोग्यविषयक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले. त्यांनी ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे आकडे सातत्याने वाढत आहे. अशात आरोग्यविषयक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले. त्यांनी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, याबाबत पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत चांगलेच फटकारले, तसेच आठ दिवसांत यात सुधारणा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक हे शुक्रवारी (दि.१६) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आढावा घेतला. काेरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता, जिल्ह्यात बेडची संख्या चारपट वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले. तात्पुरत्या स्वरूपात फुलचूर परिरातील जलराम लॉन येथे २०० खाटांचे कोविड केअर सेंटर, तसेच केटीएस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात बेडची संख्या आठ दिवसांत वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आरोग्य विभागाकडे ९४० जम्बो सिलिंडर असून, २१ तारखेपर्यंत मेडिकलमधील ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येईल. त्याचा वर्क आर्डर शुक्रवारी काढण्यात आला आहे, तसेच पुन्हा शंभर सिलिंडर खरेदी करण्यात येणार असून, यामुळे ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही, तर प्लांट सुरू होईपर्यंत भिलाई येथून ऑक्सिजन आणले जाणार असून, त्यासाठी लिंकगची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांमध्ये कोविड पेशंटना दाखल होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी खासगी रुग्णालयांना डॅश बोर्ड लावणे अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच यावर जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले, तसेच आठ दिवसांत जिल्ह्यात सर्व आरोग्यविषयक सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री मलिक यांनी दिली. आढावा बैठकीला खा.सुनील मेंढे, आ.विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापूरे, सहषराम कोरोटे, परिणय फुके, अभिजीत वंजारी, माजी आ.राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे व अधिकारी उपस्थित होते.
........
आठ दिवसात येणार नवीन आरटीपीसीआर मशिन
कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र मेडिकलमधील प्रयोगशाळेची क्षमता केवळ १२०० चाचण्यांची क्षमता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वॅब नमुने पेडिंग राहत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी नवीन आरटीपीसीआर मशिन खरेदी करण्यात येणार आठ दिवसात ही मशिन कार्यरत होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
.......
प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने दोन हजार रेमडेसिविर मिळणार
संपूर्ण राज्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही समस्या आठ दिवसात सुटणार असून रेमडेसिविरचे सहा लाख वायल खरेदी करण्यात येणार आहे. तसेच खा. प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात येथील एका कंपनीशी चर्चा केली. त्यानंतर दाेन हजार रेमडेसिविर इंजेक्शन जिल्ह्याला शनिवारपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच आपातकालीन परिस्थिती बाजारपेठेतून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले.
......
नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
रेमडेसिविर इंजेक्शन तसेच ऑक्सीजन तुटवडा याचे योग्य नियोजन व्हावे, तसेच यावर प्रशासनाची नजर रहावी यासाठी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
......
बाहेरील राज्यातील रुग्णांची करणार सोय
गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या राज्यातील रुग्ण सुध्दा गोंदिया येथे दाखल केले जातात. या रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात १० टक्के बेड राखीव ठेवण्यात येणार आहे.
.......
खासगी कोविड रुग्णालयाला पोलीस सुरक्षा
खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रुग्णांच्या नातेवाईक़ांकडून गोंधळ घालण्याचे प्रकार सुध्दा पुढे आले आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी खासगी कोविड रुग्णालयांना पोलीस सुरक्षा देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.