प्रशासन सुशासन करायचेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2016 02:50 AM2016-01-01T02:50:42+5:302016-01-01T02:50:42+5:30
जनतेच्या सेवेसाठीच आम्ही खुर्चीवर बसलो आहे. त्यांच्या समस्या व तक्रारींना सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला
गोंदिया : जनतेच्या सेवेसाठीच आम्ही खुर्चीवर बसलो आहे. त्यांच्या समस्या व तक्रारींना सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला वेग द्यायचा आहे. त्याशिवाय आमच्यावर असलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडता येणार नाही, यासाठी प्रशासन सुशासन करायचेय असा संकल्प जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर घेतला.
नववर्षाच्या आगमनासोबतच प्रत्येक जण या वर्षात काय नवीन करायचेय आणि काय सोडायचेय याचा संकल्प घेतात. यात आपल्या खाजगी जीवनात अंमल करण्यासह आपल्या कार्यक्षेत्रातही आपल्याला अपेक्षित असे काही संकल्प घेतले जातात. नववर्षाच्या या शुभागमनाच्या शुभमुहूर्तावर ‘लोकमत’ने जनतेचा थेट संबंध येणाऱ्या शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टींचा संकल्प बोलून दाखविला. (शहर प्रतिनिधी)
जनता संतुष्ट व्हायला हवी
लोकांच्या तक्रारी सोडविण्याच्या कामात पाहिजे तेवढा वेग आलेला नाही. जनता संतुष्ट होणे गरजचे आहे यासाठी प्रथम प्रशासन सुशासनात बदलायचे आहे. शिवाय कृषी व जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता करवून द्यायची आहे. जिल्हा धानासाठी प्रसिद्ध असला तरिही शेतकरी फक्त धानावरच अवलंबून राहू नये यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करून वेगवेगळे पिक घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करायचे आहे. विशेष म्हणजे पर्यटनाला चालना देऊन ‘सारस डेस्टीनेशन’ची स्थापना करायची आहे.
-डॉ.विजय सुर्यवंशी
जिल्हाधिकारी, गोंदिया
महिला सुरक्षेवर भर
महिला सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेतला जाणार आहे. यासाठी समाजात कार्य करणाऱ्या विविध संस्था व संघटनांना सहभागी करून घेऊ. शिवाय समाज व पोलीस विभागात संवाद वाढावा यासाठी विशेष उपाययोजना केली जात असून कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यात सहा हजार १४६ पोलीस मित्र तयार करण्यात आले आहे. पोलीसांकडून सुरू असलेली नियमीत काम तर होणारच. यात अवैध धंद्यावर गय केली जाणार नाही. नागरिकांना सुरक्षा देऊन त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत.
-शशिकुमार मीना
पोलीस अधीक्षक, गोंदिया
पर्यटन विकासावर फोकस
जिल्ह्याला जल, जंगल व जीव हे वरदान लाभलेले आहे. मात्र बफर झोनमध्ये असलेल्या क्षेत्रांचा विकास होऊ शकला नाही. या क्षेत्रांचा विकास करावयाचा आहे. यासाठी जिल्ह्यातील पर्यटन विकासावर फोकस असून विविध क्षेत्रांच्या विकासासाठी सुरू केलेल्या कामांना अधिक गती द्यायची आहे. विशेष म्हणजे, लोकसहभागातून वन संरक्षणाला नवे मार्ग देत जिल्ह्यात सर्वाधीक ग्रामवन तयार करायचे आहेत.
-डॉ. जितेंद्र रामगावकर
उपवनसंरक्षक, वन विभाग
विकास कामे मार्गी लावायचीय
शहरातील विविध विकासकामे पडून आहेत. ती कामे पूर्ण करायची असून शहर अधिक सुंदर व सुविधायुक्त बनवायचे आहे. कर वसुली हे नगर परिषदेचे मुख्य उत्पन्नाचे मार्ग आहे. त्यामुळे आता कर वसुलीसाठी आता जोर लावणार आहे. शिवाय नगर परिषदेचे कामकाज सुरळीत करून शहरवासीयांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार. विशेष म्हणजे, शहरातील अतिक्रमणाची समस्या गंभीर असून लोकांच्या सहकार्याने शहरातील अतिक्रमण हटवायचे आहे.
-गुणवंत वाहूरवाघ
मुख्याधिकारी, नगर परिषद
अपघातविरहित वाहतुकीचा निर्धार
गोंदिया जिल्ह्यात अपघातविरहित वाहतूक व्हावी आणि त्यासाठी जे-जे शक्य आहे ते करण्याचा संकल्प मी केला आहे. त्यात विशेषत: जड वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन व जनजागृती करणारी शिबिरे घेऊन सर्वाना मार्गदर्शन केले जाईल. यासोबतच प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षाही मी जिल्हावासीयांकडून करीत आहे.
- एन.आर. निमजे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
आरोग्य संस्थांचा कायाकल्प
जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा कायाकल्प करण्यासोबतच निरोगी गोंदिया जिल्हा करण्याचा आपला संकल्प आहे. याशिवाय रुग्णांप्रती सेवाभाव कायम ठेवायचा आहे.
- डॉ.रवी धकाते
जिल्हा शल्य चिकित्सक