कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता प्रशासन सज्ज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:14+5:302021-07-19T04:19:14+5:30
गोंदिया : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा पूर्ण क्षमतेने सामना करता यावा याकरिता जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी शनिवारी (दि.१७) येथील शासकीय ...
गोंदिया : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा पूर्ण क्षमतेने सामना करता यावा याकरिता जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी शनिवारी (दि.१७) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, केटीएस रुग्णालय, जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड उपचार केंद्र आणि तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
आपल्या भेटीदरम्यान त्यांनी कोविडच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला पूर्ण क्षमतेने करता यावा याकरिता पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यात यावी, औषधी साठा पुरेशा प्रमाणात करून ठेवण्यात यावा, तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना अपाय होऊ शकतो ही बाब विचारात घेता लहान बालकांना उपचार देता यावा याकरिता स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा, तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीप्रसंगी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वतः कोविडचा सामना करण्याकरिता पाहणी करीत असल्यामुळे अनेक समस्यांचे जागच्या जागी निराकरण होत असल्याचे यावेळी दिसून आले.
-----------------------
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये. नागरिकांनी कोविडचा प्रसार होणार नाही याकरिता राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.
नयना गुंडे
जिल्हाधिकारी, गोंदिया