हा तर प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी ‘खेळच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:20 AM2018-07-07T00:20:43+5:302018-07-07T00:21:26+5:30

शहरात गुरूवारी (दि.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. यानंतर तब्बल दोन तास झालेल्या पावसाने शहरातील जलमय झाले. तर सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले.

This is the administration's game with patients' lives. | हा तर प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी ‘खेळच’

हा तर प्रशासनाचा रुग्णांच्या जीवाशी ‘खेळच’

googlenewsNext
ठळक मुद्देन.प.चा हलगर्जीपणा भोवला : दोन तासांच्या पावसाने शहराचे हाल, १५ वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात गुरूवारी (दि.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. यानंतर तब्बल दोन तास झालेल्या पावसाने शहरातील जलमय झाले. तर सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या ज्या वार्डात पाणी साचले त्या वार्डात गर्भवती महिला आणि लहान बालके दाखल होते. नाल्यामंधील पाणी या वार्डात साचल्याने यापासून दाखल असलेल्या महिला रुग्ण आणि लहान बालकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचे सांगत शहरवासीयांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.
जिल्ह्यातील एकमेव महिला व बाल रुग्णालय म्हणून बीजीडब्ल्यू रुग्णालय ओळखले जाते. या ठिकाणी जिल्ह्यासह मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. दोन वर्षांपूर्वीच गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुध्दा मंजूर झाले. त्यामुळे रुग्णालयाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र या ठिकाणी नेमके उलटे चित्र आहे. या रुग्णालयात कधी औषधांचा तुटवडा तर कधी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागते. तर अनेकदा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे बीजीडब्ल्यू रुग्णालय नेहमीच चर्चेत राहते. खासगी रुग्णालयात जावून उपचार घेणे गोरगरीब रुग्णाना शक्य होत नसल्याने ते शासकीय रुग्णालयात येतात. मात्र येथे सुध्दा त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात गुरूवारी (दि.५) रात्री दोन तास पाऊस कोसळला. या पावसामुळे रुग्णालयातील महिला व बालकांच्या वार्डात गुडघाभर पाणी साचले.
रुग्णालय परिसरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई न केल्याने नाल्या चोख होऊन नाल्यांमधील व रस्त्यावरील घाण पाणी रुग्णालयाच्या वार्डात साचले. परिणामी दाखल असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली होती. नगरसेवक लोकेश यादव यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बाब कळताच त्यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाकडे धाव घेत वार्डात साचलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. यानंतर रुग्णालयाचे कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी हातात बकेट घेवून वार्डात साचलेले पाणी काढणे सुरू केले.
रात्री १० वाजतापर्यंत वार्डात साचलेले पाणीे काढण्याचे काम सुरू होते. प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलांच्या वॉर्डात घाण पाणी साचल्याने यापासून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे केवळ दोन तासाच्या पावसाने या रुग्णालयाचे हे हाल झाल्याने दिवसभर पाऊस कोसळला असता तर काय झाले असते, याची कल्पना न केलेली बरी. दरम्यान रुग्णालय व प्रशासनाने या सर्व गोष्टींपासून धडा घेण्याची गरज आहे.
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष
दरवर्षी पावसाळ्यात बीजीडब्ल्यू रुग्णालय परिसरातील नाल्या चोख होतात. त्यामुळे रुग्णालयाच्या रस्त्यावर पाणी साचते. हीच समस्या ओळखून बीजीडब्ल्यू रुग्णालय व्यवस्थापनाने तीन दिवसांपूर्वी नगर परिषदेला पत्र देऊन नाल्यांची साफसफाई करुन देण्याची मागणी केली होती. मात्र नगर परिषदेने या पत्राला गांर्भियाने न घेता त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच गुरुवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाचे पाणी रुग्णालयातील वार्डात साचून रुग्णांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले.
नगर परिषदेचा दुर्लक्षितपणा भोवला
यंदा पावसाळ्याला सुरूवात झाली तरी नगर परिषदेने शहरातील नाल्यांची सफाई केली नाही. शिवाय मॉन्सूनपूर्व करण्यात येणारी कामे केली नाही. त्यामुळे दोन तासाच्या पावसाने शहरातील नाल्या चोख होवून रस्त्यांवरुन पाणी वाहू लागले. शहरातील काही भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. याचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागला. नगर परिषदेने मॉन्सूनपूर्व साफ सफाईची कामे करण्याकडे दुर्लक्ष केल्याने याचा फटका बीजीडब्ल्यू रुग्णालयाला बसला.
सोशल मिडियावरुन शहरवासीयांचा संताप
गुरूवारी रात्रीच्या सुमारास बीजीडब्ल्यू रुग्णालयात पाणीे साचून रुग्णालयाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. यामुळे वार्डांत दाखल असलेल्या महिला रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. याला रुग्णालय व नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळच असून याची जिल्हा प्रशासनाने गांर्भीयाने दखल घेवून यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या सर्व प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मागविला अहवाल
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील महिला वार्डात पाणी साचल्याची घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांर्भियाने दखल घेतली. यासर्व प्रकारास कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. याचा अहवाल शुक्रवारी (दि.६) दुपारी २ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक
बीेजीडब्ल्यू रुग्णालयात वार्डात पाणी साचल्याचे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी प्रकाशीत होताच प्रशासनात एकच खळबळ उडाली.जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता या सर्वांची बैठक घेतली. बैठकीत बीजीडब्ल्यू रुग्णालयात पाणी साचण्यास नेमक्या कुठल्या गोष्टी कारणीभूत, कोणत्या विभागाने वेळीच उपाययोजना केल्या नाही, याची माहिती मागविली. मागील चार वर्षांत बीजीडब्ल्यू रुग्णालयाने नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला किती पत्र दिली याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मागविली आहे.
समितीने केली रुग्णालयाची पाहणी
बीजीडब्ल्यू रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत अधिकाºयांना फटकारल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश असलेली एक समिती गठीत केली. या समितीने शुक्रवारी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट देऊन इमारतीेची व परिसराची पाहणी केली. तसेच यावर तोडगा काढण्यासाठी काय उपाय योजना करता येईल याचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णालयाची जुनी इमारत पाडूनच समस्येवर तोडगा काढता येणे शक्य असल्याचे सांगितले.
नगर परिषदेची यंत्रणा लागली कामाला
बीजीडब्ल्यू रुग्णालयात पाणी साचल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशीत होताच शुक्रवारी सकाळपासून नगर परिषदेच्या सफाई विभागाची यंत्रणा कामाला लागली. जेसीबी व मजूर लावून रुग्णालय परिसरातील नाल्यांची सफाई करण्याची मोहीम सुरू केली.
लोकप्रतिनिधीवर टीका
बीजीडब्ल्यू रुग्णालय नव्हे तर संपूर्ण शहराची वाट लागली आहे. शहरातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे. यामुळे शहरवासीयांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व प्रकाराबद्दल शहरवासीयांनी लोकप्रतिनिधीवर फेसबुक व व्हॉट्सअपवर जोरदार टीका केली.

Web Title: This is the administration's game with patients' lives.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.