वेतन काढून देण्यासाठी मागितली लाच; सह. प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहायक अडकले जाळ्यात
By कपिल केकत | Published: September 8, 2022 12:29 PM2022-09-08T12:29:52+5:302022-09-08T12:35:06+5:30
१७ हजार रूपयांची केली होती मागणी
गोंदिया : वैद्यकीय रजेची फाईल मंजूर करवून देण्यासाठी १७ हजार रुपयांची मागणी करणारा तिरोडा येथील पंचायत समिती सहायक प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहायक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. ही कारवाई विभागाने बुधवारी (दि.७) केली आहे. प्रदीप बंसोड असे लाचखोर सहायक प्रशासन अधिकारी व प्रमोद सदाशिव मेश्राम (४९) असे वरिष्ठ सहायकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार विस्तार अधिकारी असून त्यांची वैद्यकीय रजेची फाईल मंजूर करवून वेतून काढून देण्यासाठी प्रदीप बंसोड याने स्वत:साठी सात हजार रपये तर प्रमोद मेश्राम याच्यासाठी १० हजार रूपये असे एकूण १७ हजार रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.
तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता पंचांसमक्ष लाचेची मागणी करून रक्कम प्रदीप बंसोडकडे देण्यास सांगितले. मात्र त्यानंतर आरोपींना संशय आल्याने प्रदीप बंसोड याने लाच स्वीकारण्यास नकार दिला. यावर बुधवारी पथकाने प्रमोद मेश्राम यास ताब्यात घेतले असून प्रदीप बंसोड यांचा शोध सुरू होता.
आरोपींविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पुरूषोत्तम अहिरकर यांच्या मार्गदर्शनात पोनि अतुल तवाडे, सफौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत सरपे, हवालदार संजय बोहरे, मिलकीराम पटले, शिपाई राजेंद्र बिसेन, मंगेश कहालकर, अशोक कापसे चालक दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.