मिनी मंत्रालयावर आता प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:25+5:30

ग्रामविकास विभागाने जि.प.व पं.स.च्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधिचे पत्र मंगळवारी (दि.८) जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयावर प्रशासकराज येणार आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुतदवाढीच्या चर्चेला देखील पूर्णपणे विराम मिळाला आहे.

Administrator now on the mini ministry | मिनी मंत्रालयावर आता प्रशासकराज

मिनी मंत्रालयावर आता प्रशासकराज

Next
ठळक मुद्देग्रामविकास विभागाचे धडकले आदेश : निवडणुका लांबणीवर गेल्याने निर्णय, मुदतवाढीच्या चर्चेला आता पूर्णविराम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ येत्या ११ जुलै तर जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १४ जुलै रोजी पूर्ण होत आहे. यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित होते.पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम ‘जैसे थे’ठेवण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने जि.प.व पं.स.च्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधिचे पत्र मंगळवारी (दि.८) जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयावर प्रशासकराज येणार आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुतदवाढीच्या चर्चेला देखील पूर्णपणे विराम मिळाला आहे.
मागील चार महिन्यांपासून राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना केव्हा आटोक्यात येईल हे सांगता येणे आता कठीण आहे. त्यामुळेच कोरोना संसर्गाच्या काळात निवडणुका घेणे योग्य होणार नसल्याने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र बऱ्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै मध्ये पूर्ण होत असल्याने शासन त्यांना मुदतवाढ देते की प्रशासक नियुक्त करते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ग्रामविकास विभागाने विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासंबंधिचे पत्र ग्रामविकास विभागाचे उपसचिव एकनाथ गागरे यांनी ८ जुलैला रात्री जि.प.ला पाठविल्याची माहिती आहे. या पत्रानुसार जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांची तर पंचायत समितीवर खंडविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
११ जुलैला पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्याच दिवशी तेथील सर्व कारभाराचे अधिकार प्रशासकाच्या हाती जातील. १४ जुलै रोजी जि.प.च्या पदाधिकारी सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सीईओंच्या हाती येथील सर्व सूत्रे जाणार आहेत.
त्यामुळे जि.प.आणि पं.स.वर निवडणुका होईपर्यंत प्रशासकराज चालणार आहे.

पाच वर्ष अभद्र युतीची सत्ता
एकूण ५३ सदस्यीय गोंदिया जि.प.वर मागील ५ वर्षांपासून काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आणि काँग्रेसचे १६ सदस्य मिळून जि.प.वर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन करणे सहज शक्य होते. मात्र जिल्ह्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत न जाता भाजपसह अभद्र युती करुन सत्ता स्थापन केली.त्यामुळे मागील ५ वर्षांपासून काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता आहे.

निवडणुका केव्हा होणार हे अनिश्चित
मागील चार महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आटोक्यात आला नसल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका केव्हा होतील हे सांगता येणे अनिश्चित आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आल्यावरच निवडणुका घेण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तोपर्यंत प्रशासकांच्या हातीच सर्व सूत्रे असणार आहे.

पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व
जिल्ह्यात एकूण आठ पंचायत समित्या असून यापैकी चार पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. तर उर्वरित चार पंचायत समित्यांवर मागील पाच वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आता पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्याने येथील सत्ता समिकरणात बदल होणार आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ १४ जुलै तर पंचायत समितीच्या पदाधिकारी सदस्यांचा कार्यकाळ ११ जुुलै रोजी पूर्ण होत असल्याने जि.प.व पं.स.वर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार आता पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- राजेश खवले,
प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया.

Web Title: Administrator now on the mini ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.