गोंदिया जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतवर येणार प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 07:41 PM2020-07-16T19:41:20+5:302020-07-16T19:41:41+5:30

येत्या ऑगस्ट महिन्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी २९ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे.

Administrator will come to 29 gram panchayats in Gondia district | गोंदिया जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतवर येणार प्रशासकराज

गोंदिया जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतवर येणार प्रशासकराज

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: येत्या ऑगस्ट महिन्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. शासनाने कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी २९ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे.
विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वगळून गावातील कोणताही सज्जन व अनुभवी व्यक्तींची प्रशासक म्हणून निवड करावी असे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला फेब्रुवारीमध्ये प्रारंभ करण्यात आला होता. ग्रामपंचायत प्रभाग रचना, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवगार्साठी आरक्षीत जागा निश्चित करण्यात आल्या. दरम्यान मार्च महिन्यात कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाला. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. गावपातळीवरील निवडणुका लांबणीवर गेल्या. येत्या ऑगस्टमध्ये तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.

त्यात माहुरकुडा, इसापूर,महागाव, बोंडगाव-सुरबन, केशोरी, देवलगाव, सावरटोला, बोरटोला, बोंडगावदेवी, सिलेझरी, बाराभाटी, कुंभीटोला, कवठा, तिडका, येगाव, जानवा, कोरंभीटोला, मांडोखाल, बोरी, प्रतापगड, झाशीनगर, परसोडी-रय्यत, पवनी-धाबे, करांडली, दिनकरनगर, भरनोली, इळदा, कन्हाळगाव, परसटोला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मुदतवाढ मिळणार या आशेवर ग्रामपंचायतचे पदाधिकारी होते. परंतु निवडणुक लांबणीवर गेल्याने आणि ग्रामविकास विभागाने प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिल्याने अनेकांची निराशा झाली आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार सबंधीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करण्यात येईल असे परिपत्रकात नमूद केले आहे.

हालचालीला वेग
पालकमंत्र्याच्या निदेर्शानुसार ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याने तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमध्ये हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. गावाचा प्रथम नागरिक बनण्याची सुवर्णसंधी कुणाला मिळणार याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.

 ग्रामपंचायतची मुदत नोव्हेंबरपर्यंत
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ऑगस्ट व नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे. यामध्ये २५ ग्रामपंचायत कार्यकाळ २ तसेच ३ ऑगस्टपर्यंत संपणार आहे. ईळदा, कुंभीटोला, महागाव, बोरटोला या चार ग्रामपंचायतचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्तीचे परिपत्रक निघाल्याने तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सेटिंग लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे.

Web Title: Administrator will come to 29 gram panchayats in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार