केशोरीत कोरोना संसर्ग येतोय आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:33+5:302021-05-19T04:30:33+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधून सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णसंख्या केशोरी येथे वाढलेली होती. अचानक कोरोना हॉटस्पॉट ठरलेला केशोरी परिसरातील कोरोना ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधून सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णसंख्या केशोरी येथे वाढलेली होती. अचानक कोरोना हॉटस्पॉट ठरलेला केशोरी परिसरातील कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे मागील वीस पंचवीस दिवसापूर्वी कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत होती. दररोज किमान पंधरा ते वीस पेक्षा अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन घाबरले होते. त्यामुळे तालुका प्रशासनाला चिंतेचा विषय ठरला होता. कसलाही विलंब न करता दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने कडक निर्बंध घालून सक्तीची संचारबंदी घोषित केली होती. त्या संचारबंदीस येथील ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात योग्य अंमलबजावणी झाल्याने कोरोना रोखण्यास चांगलीच मदत झाली. त्याचबरोबर येथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडलसह आरोग्य पथकाने सुनियोजित औषधोपचार कोरोना रुग्णावर करुन रुग्ण वाढीस आळा घातला. डॉ. पिंकू मंडल यांनी सांगितले की कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच चाचणी करुन औषधोपचार घेतल्यास निश्चित कोरोना बरा होताे असा विश्वास रुग्णांना दिला होता. कोरोनाचे निदान करणे सहज शक्य आहे. निदान होताच स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवून कोरोना संसर्ग रोखता येते. कोरोनाची लागण झाल्यास पहिले सहा दिवस अत्यंत महत्त्वाची आहेत. पहिल्या तीन दिवसात रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास रुग्ण निश्चित बरा होतो, असेही सांगितले. आता सध्या कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येते. यामुळे केशोरी येथे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.