केशोरीवासीयांनो सावधान! संसर्ग वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:52+5:302021-09-04T04:34:52+5:30
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या महामारीचा पहिल्या व दुसऱ्या लाटेचा चांगलाच अनुभव घेतला आहे. ...
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या महामारीचा पहिल्या व दुसऱ्या लाटेचा चांगलाच अनुभव घेतला आहे. कोरोना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्यांची आप्तेष्ट किंवा घरातील व्यक्तींचा कोरोना आजाराने निधन झाला त्यांची कुटुंब अजूनही दु:खातून सावरली नाहीत तर पुन्हा कोरोना तिसऱ्या लाटेचा तालुक्यात शिरकाव झाला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क होऊन कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मागील एक महिन्यापासून अर्जुनी मोरगाव तालुका संपूर्णपणे कोरोना मुक्त झाला होता. त्यामुळे प्रत्येक गावातील लॉकडाऊन शिथिल करून व्यवहार पूर्वपदावर आली होती. त्यामुळे काही दिवसपर्यंत कोरोना महामारीचा नागरिकांना विसर पडला होता. तोंडावर मास्क न वापरता, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर न ठेवता गावागावात नागरिकांचा वावर वाढला आहे. याचा विपरीत परिणाम कोरोना तिसऱ्या लाटेच्या रूपाने तालुक्यात एन्ट्री झाली आहे. कोरोना महामारीचा धोका अद्यापही टळला नसल्याचे आरोग्य यंत्रणा वेळोवेळी सांगत आली आहे. मात्र याकडे नागिरकांचे लक्ष नाही. कोरोना महामारीला कोणत्याही नागरिकांनी हलक्यात घेऊन दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी वेळीच तोंडावर मास्क आणि सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकडे सर्वांनी जातीने लक्ष देऊन आपण सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी केले आहे.