केशोरीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:51+5:302021-05-31T04:21:51+5:30
केशोरी : केशोरी-कनेरी येथे सतत कोरोनाबाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली होती. तालुका प्रशासनाने याची दखल घेत कंटेन्मेंट ...
केशोरी : केशोरी-कनेरी येथे सतत कोरोनाबाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली होती. तालुका प्रशासनाने याची दखल घेत कंटेन्मेंट झोन जाहीर करून पूर्ण गावात कडक संचारबंदीचे आदेश दिले होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी अर्जित केलेली अविरत सेवा आणि येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांच्या कुशल नेतृत्वात येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी राबविलेली रॅपिड अँटिजेन टेस्ट, लसीकरण, जनजागृतीसह वेळीच औषधोपचार केल्यामुळे येथील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. यावरून केशोरी-कनेरी या गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल दिसत आहे.
केशोरी-कनेरी या गावात मागील महिन्यासह मे महिन्याच्या १४ तारखेपर्यंत कोरोना विषाणूच्या महामारीने कहर केला होता. येथील नागरिक भयभीत झाले होते. आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मानसिक आधारामुळे आणि तालुका प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या सूचनांचे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी संचारबंदी संबंधी घेतलेले निर्णय व जनजागृती यामुळे गावाची स्थिती सुधारली आहे. गावातील सुज्ञ आणि तरुण सुशिक्षित नागरिक, व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांसह लॉकडाऊन काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आणि पोलीस विभागाच्या योग्य सहकार्यामुळे गावातील रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. यामुळेच गावातील कोरोनाबाबत निर्माण झालेले भीतीचे वातावरण निवळले असून नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे.
लवकरात लवकर उद्भवलेल्या कोरोनाचा संकटातून बाहेर पडू अशी खात्री त्यांना पटू लागली आहे. यामुळेच आता दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत चालू होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडल आणि त्यांचे सहकारी, सरपंच नंदू पाटील गहाणे, उपसरपंच रामकृष्ण बनकर आदींच्या सहकार्यामुळे कोरोनापासून केशोरी-कनेरी या गावांची मुक्ततेकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.