प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा गरजूंना लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:17 PM2018-06-27T22:17:59+5:302018-06-27T22:18:38+5:30
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते.
या वेळी आमदार संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक व जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बडोले म्हणाले, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जिल्ह्याला १ लाख २० हजार ६३३ उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर शिबिरे घेण्यात यावी. यासाठी गॅस एजन्सीधारकाने सहकार्य करावे. येत्या सहा महिन्यांत सर्व पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात यावे. तसेच सर्व गॅस वितरक एजन्सीपुढे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीबाबत बॅनर लावण्यात यावे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
या वेळी त्यांनी गॅस एजन्सीधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीला गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे, अर्जुनी-मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, देवरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी साहेबराव राठोड तसेच सर्व गॅस वितरक एजन्सीधारक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वनहक्क पट्ट्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढा
मागील काही वर्षांपासून वनहक्क जमिनीच्या पट्ट्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्ट्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. लोकांजवळ शेती नाही. त्यामुळे वनहक्क पट्ट्यांचे जुने दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय स्तरावर शिबिरे घेवून प्रलंबित प्रकरणे लवकराव लवकर निकाली काढण्यात यावे. उपविभागीय स्तरावर १७६३४ प्राप्त दावे असून अर्जुनी-मोरगाव ४३९२, तिरोडा ३०२, देवरी ३८० व गोंदिया निरंक, असे एकूण ५०७४ दावे प्रलंबित आहेत. अनेक वर्षांपासून लाभार्थी वनहक्क पट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे वनहक्क पट्ट्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने वैयक्तिक लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.